लग्नाला 13 वर्षे होऊनही बाळ का नाही? बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर प्रिया बापटचं उत्तर
लग्नाला 13 वर्षे होऊनही अद्याप बाळ का नाही, असा प्रश्न अभिनेत्री प्रिया बापटला अनेकदा विचारला गेला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. बेबी प्लॅनिंगविषयी सतत प्रश्न विचारणाऱ्यांना प्रियाने उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही आपल्या दमदार अभिनयाची विशेष छाप सोडली आहे. करिअरच्या दृष्टीने प्रिया जरी यशस्वी टप्प्यावर असली तरी खासगी आयुष्याबाबतच्या काही प्रश्नांना तिला सामोरं जावं लागतं. अशा वेळी ती समोरच्या व्यक्तीला काय उत्तर देते, हे नुकत्याच एका मुलाखतीत ऐकायला मिळालं. प्रिया आणि उमेश कामत यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना अद्याप मूल नाही. त्यामुळे बाळाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला तू कशी सामोरी जातेस, असं तिला या मुलाखतीत विचारण्यात आलं.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या या मुलाखतीत प्रिया म्हणाली, “तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्हाला बाळ असेल तर तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? अशा अनेक महिला आहेत, ज्यांना मूल नकोय आणि त्या त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. आपलं आयुष्य परिपूर्ण आहे, असं त्यांना वाटतं. माझ्या आणि उमेशच्या फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणारे अनेक कमेंट्स वाचायला मिळतील. उमेशच्या फोटोंवर तशा कमेंट्स नसतात. अर्थात मी महिला असल्याने लोकांना ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी बेबी प्लॅनिंग करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार.”
View this post on Instagram
याविषयी बोलताना प्रियाने पुढे एक किस्सासुद्धा सांगितला. “मी आणि उमेश एका नाटकात काम करतोय. तर नाटकानंतर अनेक लोक आम्हाला भेटायला येतात. एकेदिवशी एक काकू मला भेटायला आल्या आणि म्हणाल्या की आता आम्हाला गुड न्यूज पाहिजे. त्यावर त्यांना मी म्हणाले, आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुड न्यूज मिळाली ना. पण त्यांना बाळाविषयीचं उत्तर हवं होतं. त्यामुळे मी उत्तर देईस्तोवर त्या मला तोच प्रश्न विचारत होत्या. अखेर मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला. त्यामुळे प्लीज तुम्ही मला हा प्रश्न विचारू नका”, असं प्रियाने सांगितलं.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचं शिखर गाठलं आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास चाहते फार उत्सुक असतात.