ती उपकाराची परतफेड करतेय.. आईविषयी असं का म्हणाली प्रियांका चोप्रा?
अनेकदा प्रियांकासुद्धा तिच्या संघर्षाबद्दल, अडचणींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. अमेरिकेत शिकत असताना वर्णभेदाचा अनेकदा सामना केल्याचाही खुलासा तिने काही मुलाखतींमध्ये केला होता.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. निक जोनास आणि प्रियांका यांची लाडकी लेक मालती मेरी चोप्रा आता दोन वर्षांची झाली आहे. करिअर आणि इतर गोष्टींमध्ये कितीही व्यग्र असले तरी दोघंही मुलीसाठी आपला बहुमुल्य वेळ आवर्जून देतात. मात्र अनेकदा कामानिमित्त त्यांना मालतीपासून दूर राहावं लागतं. अशा वेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा मालतीची काळजी घेतात. “आई मालतीची काळजी घेऊन माझे उपकार परत करतेय,” असं प्रियांका म्हणाली. सध्या प्रियांका फ्रान्समध्ये तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करतेय. शूटिंगला जाताना तिने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत चाहत्यांना काही अपडेट्स दिले होते. त्यावेळी ती मालती आणि तिच्या आईविषयी व्यक्त झाली होती.
“सेटवरील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कदाचित आम्ही रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत असू. आज बरेच स्टंट सीन्ससुद्धा करायचे आहेत. मालती माझ्या आईसोबत घरी आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. माझी आई मला सांगत होती की मी लहान असताना जेव्हा ती कामावर जायची, तेव्हा मी आजीसोबत पूर्ण दिवस घरी असायचे. तेच दिवस आठवत आता माझ्या मुलीची काळजी ती घेतेय”, असं प्रियांका म्हणाली.
View this post on Instagram
गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत मधू चोप्रा या त्यांच्या मुलीविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. प्रियांका लहानाची मोठी होत असताना तिच्यासोबत फार वेळ घालवता न आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. “प्रियांका फक्त सात वर्षांची होती, तेव्हा मी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर ती 12 वर्षांची झाल्यानंतर तिला अमेरिकेला पाठवलं होतं. मला या गोष्टींची खंत जाणवते, पण प्रियांका किंवा सिद्धार्थने कधीच माझ्यावर नाराजी व्यक्त केली नाही. मी त्यांना सोडून गेले, अशी भावना त्यांच्या मनात नव्हती. विशेषकरून मला प्रियांकासोबत फार वेळ कधीच घालवता आला नव्हता”, असं मधू चोप्रा म्हणाल्या होत्या.
“प्रियांका ही आमच्या घरातली पहिली मुलगी होती आणि प्रत्येकजण तिच्यावर खूप प्रेम करायचे. मला माझ्या निर्णयांचा कधी कधी पश्चात्ताप होतो. ती सात वर्षांची असताना मी तिला पती किंवा कुटुंबीयांना परवानगीशिवाय बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. माझ्यासाठी ती चार वर्षे खूप कठीण होती. पण माझ्या मुलांनी कधीच माझ्यावर कसला आरोप केला नाही”, अशा शब्दांत प्रियांकाची आई व्यक्त झाली होती.