बहिणीच्या लग्नासाठी वेळ नव्हता पण आता..; प्रियांका चोप्रा नेटकऱ्यांकडून ट्रोल
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही पती निक जोनाससोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात आली. या लग्नसोहळ्यात प्रियांका-निकच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र एका कारणामुळे प्रियांकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने आज (शुक्रवार, 12 जुलै) राधिका मर्चंटशी लग्न केलं. केवळ देशातच नाही तर जगभरात या भव्यदिव्य लग्नसोहळ्याची चर्चा आहे. राजकारण, बॉलिवूड, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील देशविदेशातील सेलिब्रिटी अनंत आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित होते. शाहरुख खान, सलमान खान, महेंद्रसिंह धोनी, क्रिती सनॉन, अनन्या पांडे, सारा अली खान अशी बॉलिवूड सेलिब्रिटींची जितकी नावं घ्यावी तितकी कमी… यासोबतच कर्दाशियन बहिणी, जॉन सिना, गायक रेमा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेलिब्रिटीसुद्धा लग्नाला उपस्थित होते. या सर्वांत बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी प्रियांका तिच्या पतीसोबत भारतात आली. मात्र याच कारणामुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
प्रियांका चोप्रा का झाली ट्रोल?
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राने थाटामाटात लग्न केलं होतं. मात्र बहिणीच्या लग्नात प्रियांका कुठेच दिसली नव्हती. त्यावेळी परिणीती आणि प्रियांका या दोन बहिणींमध्ये भांडण झालं की काय, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. लग्नानंतर प्रियांकाने परिणीतीला सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. बहिणीच्या लग्नाला यायला वेळ नव्हता, मात्र आता अंबानींच्या लग्नासाठी बरोबर वेळ मिळाला, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
अनंत आणि राधिकाच्या लग्नात प्रियांकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर निक जोनासने गुलाबी रंगाचा सूट आणि पायजमा परिधान केला होता. अनंतच्या वरातीत प्रियांका मनसोक्त नाचतानाही दिसली. अभिनेता रणवीर सिंहसोबत तिने ठेका धरला होता. या वरातीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वरातीत प्रियांकाचा डान्स
View this post on Instagram
मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने व्यावसायिक वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी लग्न केलं. या लग्नसोहळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांपासून अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे. आधी जामनगरमध्ये तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमानंतर इटलीत क्रूझवर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व कार्यक्रमांमध्ये रिहाना, जस्टीन बिबर, केटी पेरी, बॅकस्ट्रीट बॉइज यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी परफॉर्म केलं होतं.