नवी दिल्ली : ‘बिग बॉस 16’ची माजी स्पर्धक अर्चना गौतमला धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पीएविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एससी एसटी ॲक्टअंतर्गत केस दाखल केली आहे. प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंहविरोधात तक्रार मिळाल्याची माहिती मेरठच्या पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. प्रियंका गांधी यांच्या पीएनं अर्चना गौतमला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली. अर्चनाने काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या महिन्यात रायपूरमध्ये पक्षाच्या अधिवेशनात तिने भाग घेतला होता. त्याचवेळी संदीप सिंह यांनी धमकावल्याची तक्रार तिने केली आहे. याशिवाय त्यांनी जातीवाचक अपशब्द वापरल्याचाही आरोप अर्चनाने केला आहे.
26 फेब्रुवारी रोजी अर्चनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली होती. “मला समजत नाही की अशा लोकांना ते का ठेवत आहेत, जे पक्षालाच आतून पोखरण्याचा प्रयत्न करत आहेत. संदीप सिंह यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे संदेश प्रियंका गांधी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत”, असं अर्चना या लाइव्हमध्ये म्हणाली होती. संदीप यांनी पोलीस लॉकअपमध्ये डांबवण्याचीही धमकी दिल्याचा आरोप तिने केला.
मेरठच्या पोलिसांनी संदीप सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (डी) आणि 3 (1) अंतर्गत परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
“माझी मुलगी प्रियंका गांधी यांच्या निमंत्रणानंतर काँग्रेसच्या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला गेली होती. त्यांना भेटण्यासाठी तिने पीए संदीप सिंह यांच्याकडे वेळ मागितला होता. परंतु त्यांनी प्रियंका गांधी यांच्याशी तिची भेट करून देण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर अर्चनाशी उद्धटपणे बोलत त्याने जातीवाचक टिप्पणी आणि असभ्य भाषेचा वापर केला. तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली”, असे आरोप अर्चनाचे वडील गौतम बुद्ध यांनी केले आहेत. अर्चनाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मेरठ शहराचे एसपी पियुष सिंह यांनी दिली.