मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : देशातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार… आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी राष्ट्रीय पुरस्कारवर स्वतःचं नाव कोरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते आणि त्यासाठी कलाकार सतत प्रयत्न करत असतात. मंगळवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवन, दिल्ली येथे करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानित केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे, पुरस्कार विजेत्यांना काय – काय मिळतं? विजेत्यांच्या बक्षीसाची किंमत किती असते.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना दोन विभागात विभागलं जातं. त्यानुसार बक्षीसाची रक्कम ठरते. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ अशा दोन विभागांमध्ये विजेत्यांमध्ये राष्ट्रीय पुस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण कमळ विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम अधिक असते. तर रजत कमळ पुरस्कार मिळणाऱ्या विजेत्याची बक्षीसाची रक्कम कमी असते.
सुवर्ण कमळ विजेत्याच्या बक्षीसाच्या रकमेबद्दल सांगायचं झालं तर, विजेत्यांना २.५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतात. तर इंदिरा गांधी पुरस्कार विजेत्याला २५ हजार रुपये मिळतात. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार विजेत्याला १.५ लाख रुपये मिळतात. तर दादा साहेब फाळके पुरस्करा विजेत्याला पुरस्कारासोबतच सुवर्ण कमळ, एक शॉल आणि १० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येते.
यंदाच्या वर्षीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला आहे. रजत कमळ पुरस्काराच्या बक्षीसाच्या रकमेबद्दल सांगायचं झालं तर, विजेत्यांना १.५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतात. सध्या सर्वत्र राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याची चर्चा सुरु आहे.
‘पुष्पा’ सिनेमासाठी अभिनेता अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर, अभिनेत्री आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. कलाकारांनी पुरस्कार मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची चर्चा सुरु आहे. चाहते देखील कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.