Prophet Row: “पंतप्रधानांनी हे विष..”; नुपूर शर्मा प्रकरणावर नसीरुद्दीन शाह यांनी मांडलं मत
पक्षातून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी माफी मागितली होती. या माफीवरही नसीरुद्दीन शाह यांनी नाराजी व्यक्त केली. "भावना दुखावल्याबद्दल मागितलेली ही माफी मनापासून नव्हती. असं द्वेषपूर्ण विधान पुन्हा कोणी केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही," असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढाकार घेऊन हे विष पसरवण्यापासून थांबवावं, असं मत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रकरणी मांडलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी सर्व स्तरांतून नाराजीचे सूर उमटले. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पक्षाने त्यांना निलंबित केलं आहे. नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह विधानप्रकरणी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाराजीचा सामना करावा लागत आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह या प्रकरणावर व्यक्त झाले.
“मी पंतप्रधानांना आवाहन करतो की..”
“मी त्यांना (पंतप्रधानांना) आवाहन करतो की त्यांनी या लोकांमध्ये काही चांगली भावना निर्माण करावी. हृषिकेशमधल्या ‘धर्म संसद’मध्ये जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल, तर त्यांनी तसं सांगितलं पाहिजे. जर त्यांचा विश्वास नसेल तर तसंही स्पष्ट केलं पाहिजे”, असं ते म्हणाले. दरम्यान, सर्व धर्मांबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणं पक्षाला मान्य नाही, असं स्पष्टीकरण भाजपने रविवारी दिलं. यावरही शाह पुढे म्हणाले, “भारत सरकारने जे काही केलं ते खूप थोडं आणि खूप उशिरा होतं. त्यांनी तोंड उघडून अशा प्रकारच्या विधानांचा निषेध करण्याआधी आठवडा उलटून गेला होता. पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानसारख्या देशात, ज्यांना आपण एकेदिवशी ‘अखंड भारत’मध्ये समाविष्ट करू इच्छितो, अशा देशांमध्ये या विधानांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. कारण तिथे अशी विधानं अत्यंत निंदनीय मानली जातात. इथं त्यावरून सरकारकडून आवाजही उठवला गेला नाही आणि लाखोंच्या भावना दुखावल्या गेल्याची जाणीवही त्यांना नाही.”
“नुपूर शर्मा यांची माफी मनापासून नव्हती”
पक्षातून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी माफी मागितली होती. या माफीवरही नसीरुद्दीन शाह यांनी नाराजी व्यक्त केली. “भावना दुखावल्याबद्दल मागितलेली ही माफी मनापासून नव्हती. असं द्वेषपूर्ण विधान पुन्हा कोणी केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. तुम्ही शांतता आणि एकतेबद्दल बोलता आणि एका वर्षाहून अधिक काळासाठी तुरुंगात पाठवलं जातं. तुम्ही नरसंहाराबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला शिक्षा दिली जाते. ही दुटप्पी भूमिका आहे,” अशी टीका त्यांनी केली. मुस्लीम समाजाविरुद्ध बोलल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण वक्तव्यांविरोधात आता समजूतदार हिंदूंनी व्यक्त होण्याची हीच वेळ आहे, असंही ते म्हणाले.
“आपल्याला पाकिस्तान, अफगाणिस्तानचं अनुकरण करायचं नाहीये”
यावेळी शाह यांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा निषेध केला. नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. “धमकीचा हा मार्ग चुकीचा आहे. यामुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये इतका गोंधळ आहे. आपल्याला या देशांचं अनुकरण करायचं नाहीये. पण तरीही आपण तसं बिनदिक्कतपणे करत आहोत. केवळ गाईच्या कत्तलीसाठीच नाही तर फक्त संशयावरूनही लोकांची हत्या केली जातेय. मृत गाईचे कातडे काढणाऱ्या अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारले जात आहेत. हे असे प्रकार भारतात कधीच होत नसत किंबहुना इस्लामिक देशांमध्ये असं घडत असे”, असं शाह म्हणाले.
“वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया जबाबदार”
नसीरुद्दीन शाह यांनी द्वेषाचा प्रचार करण्यासाठी वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाला जबाबदार ठरवलं. वाराणसीच्या ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाचा संदर्भ देताना शाह म्हणाले, “हे द्वेष निर्माण केलं जातंय. हे एक प्रकारचं विष आहे. जेव्हा तुम्ही आपल्यापेक्षा विरुद्ध मत असलेल्या व्यक्तीचा सामना करता तेव्हा ते विष पसरण्यास सुरुवात होते.”
बॉलिवूडमधील खानमंडळी का व्यक्त होत नाहीत?
शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान हे कलाकार या विषयांवर व्यक्त का होत नाहीत, असा प्रश्न विचारला असता नसीरुद्दीन शाह म्हणाले, “कदाचित त्यांना भीती असेल. पण ते त्यांच्या विवेकबुद्धीला कसं उत्तर देऊ शकतील हे मला माहित नाही. मला असं वाटतं की त्यांच्याकडे गमावण्यासारखं खूप काही आहे.”
आर्यन खानला अटक झाली तेव्हा शाहरुखच्या एकंदर वागणुकीवरही शाह यांनी भाष्य केलं. “संपूर्ण परिस्थितीला तो ज्या पद्धतीनं सामोरं गेला, ते खरंच वाखाणण्याजोगं होतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘द काश्मीर फाइल्स’वर टीका
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, “काश्मिरी हिंदूंच्या दु:खाची ही काल्पनिक आवृत्ती आहे. सरकार त्यांचं पुनर्वसन करण्याऐवजी, त्यांना सुरक्षा पुरविण्याऐवजी अशा चित्रपटांचा प्रचार करतेय. हा अपप्रचार आहे आणि लोक त्यात स्वेच्छेने सहभागी होत आहेत. मला भीती वाटते की भविष्यात असे आणखी चित्रपट येतील की काय?”
“मी या देशात असंतुष्ट नाही”
“मी या देशात नक्कीच असंतुष्ट किंवा दु:खी नाही. मी ज्या देशात लहानाचा मोठा झालो, ज्या देशाने मला प्रेम करायला शिकवलं, ज्या देशाचा मी आहे असं मला सांगितलं गेलंय आणि मला वाटतं की मी त्याच देशाचा आहे. मी सुदैवाने अशा स्थितीत आहे जिथे मला दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. मला अजूनही काम मिळत आहे आणि असं नाही की माझ्या विधानांमुळे मला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की काहीतरी चांगलं व्हावं. परंतु ते लवकर होईल असं वाटत नाही. ही द्वेषाची लाट कधीतरी ओसरेल. ते कदाचित मी हयात असताना घडणार नाही, पण ते कधीतरी नक्कीच होईल”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.