प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतर ‘पुष्पा 2’मधील गाणं करावं लागलं डिलिट; अल्लू अर्जुनचा वाद भोवला
'पुष्पा 2' या चित्रपटाच्या 22 दिवसांनंतर निर्मात्यांना त्यातील एक गाणं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून डिलिट करण्यात आलं. हे गाणं रिलिज करण्यासाठी निर्मात्यांनी अत्यंत चुकीची वेळ निवडल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.
एकीकडे अभिनेता अल्लू अर्जुन हा संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणामुळे वादात अडकला असताना दुसरीकडे ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील एक वादग्रस्त गाणं युट्यूबवर प्रदर्शित करण्यासाठी चुकीची वेळ निवडली. 24 डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘दम्मुंट्टे पट्टुकोरा’ हे गाणं युट्यूबवर रिलीज केलं. मात्र अवघ्या काही तासांतच त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे अखेर निर्मात्यांना ते गाणं युट्यूबवरून काढून टाकावं लागलं. इतकंच नव्हे तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही हे गाणं हटवण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये पुष्पा (अल्लू अर्जुन) आणि इन्स्पेक्टर भंवर सिंह शेखावत (फहाद फासिल) यांच्यातील वाद चित्रित करण्यात आला आहे.
गाण्यात नेमकं काय?
‘पुष्पा 2’मधील एका दृश्यात भंवर सिंह शेखावत (फहाद फासिल) हा लाल चंदनाचा तस्कर पुष्पाराजचं (अल्लू अर्जुन) रेकॉर्डिंग करताना दिसून येतो. ज्यामध्ये पुष्पा त्याला चॅलेंज करतो की, “दम्मुंट्टे पट्टुकोरा शेखावतू, पट्टूकुंटे वदिलेस्ता सिंडिकेटू” (हिंमत असेल तर मला पकडून दाखव शेखावत, जर तू यशस्वी झालास तर मी सिंडिकेट सोडेन.) यानंतर जेव्हा भंवरला वाटू लागतं की त्याने पुष्पाला हरवलंय, तेव्हा त्याच्या त्याच डायलॉगचा रिमिक्स व्हर्जन एखाद्या गाण्याप्रमाणे वाजवतो आणि त्यावर नाचू लागतो.
Dhammunte Pattukora Shekawathu 💥#AlluArjun ❤🔥#Pushpa2TheRule pic.twitter.com/oyU3IrunL4
— 𝐔𝐃𝐇𝐀𝐘𝐀𝐍𝐀𝐓𝐇𝐀𝐍🦅 (@NathanUtha58046) December 24, 2024
चुकीचा टायमिंग
या गाण्याचे बोल आणि त्याच्या प्रदर्शनाच्या चुकीच्या वेळेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर खटला सुरू आहे. या घटनेवरून खऱ्या आयुष्यात पोलीस आणि अल्लू अर्जुन यांच्यात बऱ्याच घडामोडी दिसत असताना चित्रपटात पोलिसाला धमकावण्याच्या डायलॉगवरून थेट गाणं प्रदर्शित केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. देवी श्रीप्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं टी-सीरिजने 24 डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केलं. मात्र पोलिसांना आव्हान देणारे डायलॉग्स या गाण्यात असल्याने त्याची वेळ चुकली असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. या गाण्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहून अखेर निर्मात्यांनी हे सगळीकडून हटवण्याचा निर्णय घेतला.
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 डिसेंबरला त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर पोलीस विभाग आणि तेलंगणा सरकार यांनी अल्लू अर्जुनवर विविध आरोप केले आहेत. अल्लू अर्जुन बेजबाबदारपणे वागला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.