लग्नाचं आमीष देऊन शोषण; ‘पुष्पा’ फेम अभिनेत्यावर गंभीर आरोप, FIR दाखल
पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता श्रीतेज याच्याविरोधात एका महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेनं श्रीतेजवर बरेच गंभीर आरोप केले आहेत.
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटात त्याच्या ऑनस्क्रीन भावाची भूमिका साकारलेला अभिनेता श्रीतेज एका गंभीर वादात अडकला आहे. लग्नाचं आमीष दाखवून महिलेचं शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या आरोपांमुळे त्याच्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेनं हैदराबाद पोलिसांकडे श्रीतेजविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्रीतेजला मला आधी लग्न करण्याचं वचन दिलं होतं, पण नंतर त्याने या वचनातून माघार घेतल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. याशिवाय तिने त्याच्यावर शोषणाचाही आरोप केला आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेनं 25 नोव्हेंबर 2024 रोजी कुकटपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने म्हटलंय की श्रीतेजने तिला रिलेशनशिपमध्ये फसवलंय. त्याने लग्नाचं आमीष दिलं आणि 20 लाख रुपयांचं आर्थिक शोषण केलं. यासोबतच तिने दावा केला की रिलेशनशिपमध्ये असतानाही तो अर्चना नावाच्या एका दुसऱ्या महिलेसोबत नात्यात होता आणि त्या दोघांना सात वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.
संबंधित पीडित महिला आणि श्रीतेज हे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्याने माझी फसवणूक केली आणि आता तो मला टाळतोय, असा आरोप करत महिलेनं तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे गचीबोवली पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ (गुन्ह्याच्या कार्यक्षेत्राचा विचार न करता नोंदवलेली एफआयआर) दाखल केली आहे. नंतर हे प्रकरण कुकटपल्ली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं.
पीडित महिलेनं असाही आरोप केला आहे की तिने पहिल्यांदा याप्रकरणी एप्रिल महिन्यात तक्रार दाखल केली होती. मात्र अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून योग्य पावलं उचलली जाणार असल्याचं आश्वासन मिळाल्याने तिने ती तक्रार मागे घेतली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीतेजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीतेजला कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांमुळेही तो वादात सापडला होता. श्रीतेजने ‘पुष्पा’, ‘धमाका’, ‘मंगलावरम’ आणि ‘बहिष्करण’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय.