‘जाने बलमा घोड़े पे क्यों सवार है’ गाण्याच्या गायिकेसाठी चाहते वेडे; लग्नाचीही केली इच्छा व्यक्त
विशेष म्हणजे नेटफ्लिक्सवर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ते गाणं व्हायरल झालं नव्हतं. बऱ्याच दिवसांनी अचानक हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं होतं.
मुंबई: तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर आतापर्यंत ‘जाने बलमा घोड़े पे क्यों सवार है’ हे गाणं नक्कीच ऐकलं असणार. इन्स्टाग्राम रिल्समध्ये असंख्य नेटकऱ्यांनी या गाण्यावर रिल्स पोस्ट केले आहेत. तृप्ती डिमरी आणि बाबिल खान यांच्या ‘कला’ या चित्रपटातील हे गाणं आहे. सोशल मीडियावर तुफान गाजलेलं हे गाणं दाक्षिणात्य गायिका सिरीशा भागवतुलाने गायलं आहे.
“या गाण्याला इतका प्रतिसाद मिळेल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मी जेव्हा मुंबईला पोहोचले होते, तेव्हा ते गाणं आणि त्याचं कंपोझिशन ऐकूनच मला खूप आवडलं. मी दोन वर्षांपूर्वी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि खरं सांगायचं झाल्यास, त्या गाण्याला लोकांसमोर कसं सादर करायचं हेच मी विसरले होते”, असं सिरीशा म्हणाली.
विशेष म्हणजे नेटफ्लिक्सवर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ते गाणं व्हायरल झालं नव्हतं. बऱ्याच दिवसांनी अचानक हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं होतं. “मला सोशल मीडियावर सतत मेसेज येत आहेत. मला तुझ्या आवाजाशी लग्न करायचं आहे, असंही काहींनी लिहिलंय. संगीत श्रेत्रातील अनेक दिग्गजांनीही माझं कौतुक केलंय”, असं तिने सांगितलं.
‘घोडे पे सवार’ हे गाणं रेट्रो स्टाइलचं असूनही तरुणाईमध्ये ते खूप गाजतंय, याचं आश्चर्य सिरीशाने व्यक्त केलं. “आजच्या काळात मला असं गाणं गाण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला खूप नशिबवान समजते”, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.
अमित त्रिवेदी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं. सिरीशाने तीन ते चार रिटेकमध्ये हे संपूर्ण गाणं रेकॉर्ड केलं होतं. सिरीशाने गायनाच्या अनेक रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. तिच्या पहिल्या शोमध्ये RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याचे संगीतकार एम. एम. किरवाणी परीक्षक होते.