मुंबई : धर्मगुरू राधे माँ यांचा मुलगा हरजिंदर सिंह हा लवकरच ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यामध्ये तो स्पेशल टास्क फोर्स अधिकाऱ्यांपैकी एकाची भूमिका साकारणार आहे. “इन्स्पेक्टर अविनाश हा एक रंजक प्रोजेक्ट आहे आणि ही मोठी सीरिज आहे. यातील कलाकारांना प्रेक्षकांसोबत जास्त वेळ घालवता येईल, ही एक चांगली गोष्ट आहे. यातील प्रत्येक भूमिका एपिसोडनुसार आणखी रंजक होत जाते. यामध्ये मी एका तरुण आणि मेहनती एसटीएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय. ज्याला उत्तरप्रदेशातील वाढत्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात येतं. तो स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी आणि एसटीएफमध्ये विशेष छाप सोडण्यासाठी विविध प्रयत्न करतो”, असं तो म्हणाला.
वेब सीरिजच्या कथेविषयी बोलताना हरजिंदर पुढे म्हणाला, “90 च्या दशकातील या कथेची सुरुवात उत्तरप्रदेशच्या लोकांनी होते. ही एक फास्ट, अॅक्शन आणि गन ब्लेझिंग सीरिज आहे. मी जी भूमिका साकारतोय, तो अधिकारी तिथल्या स्थानिक लोकांमध्ये राहून, त्यांच्या मिसळून गुन्हेगारांचा शोध लावतो. मला तिथल्या लोकांचं राहणीमान आणि बोलण्याची पद्धत याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं होतं.”
या सीरिजमध्ये हरजिंदर हा अभिनेता रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याविषयी तो म्हणाला, “या सीरिजमध्ये मी रणदीपसोबत काम करून खूप आनंदी आहे. कोणतीही व्यक्ती त्याच्या कामाकडे पाहून आकर्षित होऊ शकते. मला फक्त एक सेलिब्रिटी म्हणूनच नाही तर कलाकार म्हणूनही पुढे जायचं आहे. त्यामुळे विविध भूमिका साकारण्यावर मी भर देणार आहे.”
अभिनयात यश मिळालं नाही तर कौटुंबिक व्यवसाय सांभाळेन, असंही तो या मुलाखतीत म्हणाला. “मी एका बिझनेस फॅमिलीतून आलो आहे. माझ्या कुटुंबीयांनी अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक केली आहे. मी माझ्या स्वप्नांना साकार करावं, असंच त्यांनी मला शिकवलं आहे. पण जर अभिनयात मी चांगलं काम करू शकलो नाही तर मी फॅमिली बिझनेसवर लक्ष केंद्रीत करेन”, असं त्याने स्पष्ट केलं.
राधे माँ एक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आहे. त्या स्वत:ला देवीचा अवतार मानतात. राधे माँ यांचं मूळ नाव सुखविंदर कौर असं आहे. धर्माच्या मार्गावर आल्यानंतर त्यांनी नाव बदलून राधे माँ असं ठेवलं.