Rahul Deshpande : काही तरी मिळणार ही खात्री होती, राष्ट्रीय पुरस्कारानं त्यावर मोहर उमटवली, पुरस्कार जाहीर झाल्यावर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया
मला वाटले एकतरी पुरस्कार मिळेल मात्र साऊंड डिझाइन आणि गायन अशा दोन विभागात पुरस्कार मिळाले, आनंद झाला, असे राहुल देशपांडे म्हणाले.
पुणे : मी वसंतराव या चित्रपटासाठी काही तरी मिळणार ही खात्री होती आणि राष्ट्रीय पुरस्काराने त्यावर मोहर उमटवली, खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. मी वसंतराव देशपांडे या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना यंदाचा पार्श्वगायनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards) जाहीर झाला आहे. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9ला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केले. राहुल देशपांडे यांचे आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मी वसंतराव (Me Vasantrao) या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आज आपण जे काही आहोत ते आपल्या आजोबा वसंतराव देशपांडे यांच्यामुळे आहोत, असे राहुल देशपांडे म्हणाले.
‘सर्वांनीच मेहनत घेतली’
चित्रपट, गायन यासाठी खूप मेहनत घेतली होती. अनेकांनी सांगितले, की चित्रपट अप्रतिम झालेला आहे. चित्रपटाचे संगीत चांगले झाले आहे, चित्रपटातील सर्वांची कामे चांगली झाली आहेत, दिग्दर्शन अप्रतिम झालेले आहे, टेक्निकलीही फिल्म चांगली झाली. मला वाटले एकतरी पुरस्कार मिळेल मात्र साऊंड डिझाइन आणि गायन अशा दोन विभागात पुरस्कार मिळाले, आनंद झाला, असे राहुल देशपांडे म्हणाले.
राहुल देशपांडेंच्या कुटुंबीयांशी बातचीत
अजूनही विश्वास बसत नाही
अजूनही पुरस्कार मिळाला, यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे यावर व्यक्त होण्यास शब्द सापडत नाहीत. फिल्म शूटिंगच्या वेळी आम्ही 70 टक्केवेळा राहुलसोबत असायचो. त्यावेळी शूटिंगनंतरही राहुल कधी थकला असे वाटले नाही. एका गाण्याच्या सात सात चाली तो बनवायचा, असे राहुलच्या कुटुंबीयांनी सांगितले. तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रडू आले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राहुल देशपांडेंच्या आईने व्यक्त केली. विशेष म्हणजे राहुल यांची मुलगी रेणुका हिलादेखील पुरस्कार मिळण्याची खात्री होती. खुद्द चिमुकलीने हे सांगितले. तर राहुलची मेहनत खूप जवळून पाहिली आहे. त्याला आता पुरस्कार मिळाला आहे, असेच पुरस्कार मिळत राहोत, अशी भावनाही कुटुंबीयांनी व्यक्त केली.