ऐश्वर्या राय, विराट कोहलीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी? भाजपवर टीका करताना सेलिब्रिटींचा उल्लेख
नवी दिल्लीतल्या सामाजिक न्याय संमेलनात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला. भाजपवर टीका करताना त्यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर बोलताना दिसले. “मला राजकारणात रस नाही, मी गंभीर नाही, असं ते मीडियासमोर बोलायचे”, असं म्हणत त्यांनी पुढे अभिनेत्री ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर विराट कोहली यांचा उल्लेख केला. या तिन्ही मोठ्या सेलिब्रिटींचं नाव घेत राहुल गांधीनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी?
“माझ्याबद्दल ते मीडियात म्हणायचे की मला राजकारणात रस नाही, मी राजकारणाविषयी गंभीर नाही. त्यांच्यासाठी मनरेगा आणि भूसंपादन विधेयकाबाबत लढणारा गंभीर नाही, तर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि विराट कोहली यांच्याविषयी बोलणारा गंभीर आहे का”, असा सवाल त्यांनी केला. नवी दिल्लीतल्या सामाजिक न्याय संमेलनात राहुल गांधी बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, “काही लोकच मुद्द्यांवर चर्चा करतात आणि मत व्यक्त करतात. पण 90 टक्के लोक काय विचार करतात, याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मी त्या 90 टक्के लोकांविषयी बोलतो, म्हणून मला गंभीर नसल्याचं म्हटलं जातं.” मीडियात एकसुद्धा आदिवासी, दलित आणि ओबीसी अँकर नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.
“They used to say about me in the media that I am not interested in politics, I am not serious about politics. For them, the one fighting on MNREGA and the land acquisition bill is non-serious, while the one talking about Amitabh, Aishwarya Rai, and Virat Kohli is serious?” says… pic.twitter.com/ZyVGnSa14b
— IANS (@ians_india) April 24, 2024
राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात अशा पद्धतीने ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडमध्ये ट्रान्सपोर्ट नगर चौकमधील सभेत राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिरात आयोजित केलेल्या भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमाला ओबीसीचे कोणतेच सदस्य का नव्हते, असा सवाल त्यांनी केला होता. “मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अंबानी, अदानी आणि सर्व बिझनेसच्या लोकांना पाहिलं, पण मला त्यात एकही गरीब माणूस दिसला नाही. एकही शेतकरी, मजूर, बेरोजगार व्यक्ती त्या सोहळ्याला उपस्थित नव्हती”, असं ते म्हणाले होते.
दुसऱ्या एका रॅलीतही त्यांनी ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला होता. “ऐश्वर्या डान्स करताना दिसेल आणि बच्चन साहेब बल्ले बल्ले करताना दिसतील”, असा टोला त्यांनी लगावला होता. यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून बरीच टीका झाली होती.