वैजयंतीमालासोबतच्या राज कपूर यांच्या अफेअरमुळे पत्नीने सोडलं होतं घर; काय आहे तो किस्सा?
राज कपूर आणि वैजयंती माला यांनी 1961 मध्ये 'नजराना' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर राज कपूर दिग्दर्शित 'संगम' चित्रपटातही दोघांनी पुन्हा काम केलं होतं. यामध्ये राजेंद्र कुमार यांचीही भूमिका होती.
राज कपूर हे त्यांच्या काळातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या चित्रपटांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही झाल्या आहेत. कृष्णा यांच्याशी लग्नानंतरही राज कपूर यांचं नाव इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. राज कपूर यांचा मुलगा आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात या घटनांचा उल्लेख केला होता. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं की जेव्हा राज कपूर यांचं अभिनेत्री वैजयंतीमालाशी अफेअर होतं, तेव्हा आई कृष्णा मुलांसह घरातून निघून गेली होती.
“माझ्या वडिलांचं जेव्हा नर्गिस यांच्यासोबत अफेअर होतं, तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मला त्याचा फटका बसला नव्हता. त्यावेळी घरातही तसं काही वातावरण निर्माण झालं नव्हतं. पण एक गोष्ट मला चांगलीच आठवतेय की जेव्हा वडिलांचं नाव वैजयंतीमाला यांच्याशी जोडलं जात होतं, तेव्हा आई माझ्यासोबत घरातून निघून गेली होती. आम्ही मरीन ड्राइव्हच्या नटराज हॉटेलमध्ये राहायला गेलो होतो. यावेळी आईने सर्वकाही थांबवण्याचा निर्णय घेतला होता. हॉटेलनंतर आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूट अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आई आणि आमच्यासाठी हे अपार्टमेंट घेतलं होतं. आईचं मन पुन्हा जिंकण्यासाठी ते सर्वकाही प्रयत्न करत होते. पण माझ्या आईने तोपर्यंत हार मानली नाही, जोपर्यंत त्यांनी वैजयंतीमालासोबतच्या अफेअरला पूर्णविराम दिला नाही”, असं ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं.
View this post on Instagram
या पुस्तकात ऋषी कपूर यांनी वैजयंतीमाला यांचीही बाजू मांडली होती. वैजयंतीमाला यांनी राज कपूर यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांना फेटाळलं होतं. इतकंच नव्हे तर प्रसिद्धीसाठी ते अशा प्रकारच्या रोमँटिक कथा निर्माण करतात, असा आरोप त्यांनी राज कपूर यांच्यावर केला होता. याविषयी ऋषी यांनी पुढे लिहिलं होतं, “काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत वैजयंतीमाला यांनी माझ्या वडिलांसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारलं होतं. प्रसिद्धीच्या भुकेपोटी त्यांनी रोमँटिक गोष्टी पेरल्या होत्या, असा आरोप वैजयंतीमाला यांनी केला होता. मी खूप चिडलो होतो. त्या अशा कशा बोलू शकतात? अफेअर कधी नव्हतंच असं नाट्य ते कसं करू शकतात? सत्याशी छेडछाड करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. कारण सत्याबाबत बोलण्यासाठी माझे वडील हयातीत नव्हते.”
जेव्हा वैजयंतीमाला यांच्या आयुष्यावरील पुस्तक प्रकाशित झालं होतं, तेव्हा ऋषी कपूर यांना त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले, “जसजसा वेळ गेला, तसतसा माझा राग शांत झाला. मी या गोष्टीचा स्वीकार करायला शिकलो की लोकांना ज्या गोष्टी स्वत:साठी अन्कम्फर्टेबल वाटतात, त्या झाकण्याचा ते प्रयत्न करतात. पण हे मी निश्चितच सांगू शकतो की जर बाबा आज जिवंत असते तर वैजयंतीमाला यांनी त्यांच्यासोबतच्या अफेअरला इतक्या निदर्यीपणे नाकारलं नसतं आणि त्यांना प्रसिद्धीसाठी भुकेलेले असल्याचं म्हटलं नसतं.”