Rajat Bedi | ‘कोई.. मिल गया’मुळे डिप्रेशनमध्ये गेला अभिनेता; बऱ्याच वर्षांनंतर सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण
रजतने मुलाखतीत असंही सांगितलं की त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. कधी चित्रपटातील त्याचे चांगले सीन्स कट केले जायचे, तर कधी त्याला मिळालेले चेक बाऊन्स व्हायचे.
![Rajat Bedi | 'कोई.. मिल गया'मुळे डिप्रेशनमध्ये गेला अभिनेता; बऱ्याच वर्षांनंतर सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण Rajat Bedi | 'कोई.. मिल गया'मुळे डिप्रेशनमध्ये गेला अभिनेता; बऱ्याच वर्षांनंतर सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/27163003/Rajat-Bedi.jpg?w=1280)
मुंबई : अभिनेता रजत बेदीने राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोई.. मिल गया’ या चित्रपटात राज सक्सेनाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘कोई.. मिल गया’मधील रजतची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठा धक्का बसल्याचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून केला. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील रजतचे काही सीन्स कापण्यात आले होते. रजतने ‘द मुकेश खन्ना शो’ला दिलेल्या मुलाखतीत करिअरमधील अत्यंत महत्त्वाच्या काळाविषयी वक्तव्य केलं.
“कोई.. मिल गया चित्रपटाचा फायदा झाला नाही”
इंडस्ट्रीत अडकून पडल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली. यामागचं कारण विचारलं असता तो म्हणाला, “मला कोई.. मिल गया या चित्रपटात ब्रेक तर मिळाला. पण त्यामुळे माझ्या करिअरला काही फायदा झाला नाही. अखेरच्या एडिटिंगमध्ये माझे बरेच सीन्स कापण्यात आले होते. इंडस्ट्रीतील माझ्या कामावर निराश झाल्यानंतर अखेर मी कॅनडाला गेलो. माझे इतरही चित्रपट चालले, पण कोई.. मिल गयापेक्षा मोठा हिट कोणताच नव्हता. तरीसुद्धा या चित्रपटाचा मला फायदा झाला नाही.”
“प्रमोशनपासून दूर ठेवलं”
“चित्रपटात माझी भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र फायनल एडिट करताना प्रिती झिंटासोबतचे माझे सीन्स कापण्यात आले. त्याहून निराशाजनक बाब म्हणजे जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या प्रमोशनपासून मला दूर ठेवलं होतं. एक अभिनेता म्हणून तुमच्या काही अपेक्षा असतात. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो”, असं त्याने पुढे सांगितलं.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/23142453/Adipurush-25.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/27145800/Malaika-Arora-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/27144904/Pooja-Bhatt-and-Salman-Khan.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/27135849/Prithviraj-Sukumaran.jpg)
कोई.. मिल गया हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये हृतिक रोशनने एका मनोरुग्णाची भूमिका साकारली होती, ज्याच्या आयुष्यात एलियन आल्यानंतर सर्वकाही बदलतं. हृतिकसोबत प्रिती झिंटा आणि रेखा यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
“कधी सीन्स कट तर कधी चेक बाऊन्स”
रजतने मुलाखतीत असंही सांगितलं की त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. कधी चित्रपटातील त्याचे चांगले सीन्स कट केले जायचे, तर कधी त्याला मिळालेले चेक बाऊन्स व्हायचे. स्वत:ची प्रगती कशी करावी, हे समजू शकत नसल्यामुळे तो खूप निराश झाला होता. रजतने त्याच्या कारकिर्दीत बऱ्याच खलनायची भूमिका साकारल्या आहेत. ‘पार्टनर’ या चित्रपटात त्याने सलमान खान आणि गोविंदासोबतही काम केलं.