IND vs NZ Semi Final : टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी ‘थलायवा’ रजनीकांत मुंबईत दाखल
सलग नऊ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाचा सामना आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड टीमशी होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने आपली विजयी लय कायम राखली आहे आणि आता सेमी फायनलमध्येही त्यांचा प्रयत्न याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा राहील.
मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | आपल्या मायभूमीवर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टीम इंडियाने विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. वर्ल्ड कप 2019 प्रमाणेच यंदाही भारतासमोर सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान आहे. गेल्या वेळी न्यूझीलंड संघानेच भारताचा विजयरथ रोखला होता. आज होत असलेल्या सामन्यात त्या पराभवाचा वचपा काढून वर्ल्ड कप विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. हा सामना याची देही याची डोळा पाहण्याची असंख्य क्रिकेटप्रेमींची इच्छा असते. अशीच इच्छा ‘थलायवा’ रजनीकांत यांचीही आहे. तीच पूर्ण करण्यासाठी रजनीकांत त्यांची सर्व कामं बाजूला सारून मुंबईत आले आहेत. आज (बुधवार) दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होणार असून त्यापूर्वी रजनीकांत मुंबईत दाखल झाले आहेत. एअरपोर्टवरील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी पापाराझी आणि फोटोग्राफर्सकडे त्यांनी हात दाखवला. इतकंच नव्हे तर ‘मेन इ ब्ल्यू’ला पाठिंबा देण्यासाठी स्वत: रजनीकांतसुद्धा निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रजनीकांत यांना गोल्डन तिकिट दिलं होतं. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती. ‘आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की थलायवा रजनीकांत हे वर्ल्ड कपमध्ये आमचे प्रतिष्ठित पाहुणे म्हणून सहभागी होतील’, असं त्यांनी लिहिलं होतं. यामुळेच सेमी फायनलचा मॅच पाहण्यासाठी रजनीकांत मुंबईत दाखल झाले.
पहा व्हिडीओ
#baasha bhai arrived Mumbai to watch the semi finals of #CWC2023 between #IndvsNZ at Wankade stadium #Rajinikanth | #SuperstarRajinikanth | #Jailer | #superstar @rajinikanth | #Thalaivar171 | #CWC | @ICC | @BCCI pic.twitter.com/wCFoOWNWV9
— Suresh balaji (@surbalutwt) November 15, 2023
दरम्यान भारताला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी ही कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. तसंच वानखेडेवर गेल्या मॅचमध्ये सेंच्युरीने हुलकावणी दिलेल्या विराट कोहलीचा प्रयत्न सचिन तेंडुलकरचा सेंच्युरींचा विक्रम मोडीत काढण्याचा राहील. मध्यक्रमात श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आतापर्यंत निर्णायक योगदान दिलं आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्येही त्यांच्याकडून टीमला अपेक्षा असतील. भारताचा वेगवान बॉलर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तसंच कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यावर फिरकीची मदार राहील.