Rajinikanth बनले देशातील सर्वांत महागडे अभिनेते; ‘जेलर’ने 600 कोटी कमावताच निर्मात्यांकडून कोट्यवधींची भेट
रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या या कमाईनंतर निर्मात्यांनी रजनीकांत यांना नफ्यातील काही भाग दिला आहे. त्याचसोबत आलिशान गाडीसुद्धा भेट दिली.
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : वयाच्या 72 व्या वर्षीही साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘जेलर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहेत. ‘जेलर’मधील भूमिकेसाठी रजनीकांत यांनी सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत महागडे अभिनेते बनले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, किंग शाहरुख खान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांनासुद्धा त्यांनी मागे टाकलं आहे. ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर निर्माते कालानिधी मारन यांनी रजनीकांत यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी कमावलेल्या नफ्याचा चेक ‘थलायवा’ला सोपविला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निर्मात्यांनी दिला नफ्याचा चेक
चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयाबालन यांनी ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये निर्माते कलानिधी हे रजनीकांत यांच्या हातात चेक सोपवताना दिसत आहेत. नफा कमावल्याचा हा चेक तब्बल 100 कोटी रुपयांचा असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी रजनीकांत यांनी ‘जेलर’मधील मुख्य भूमिकेसाठी 110 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. त्यामुळे मानधन आणि नफा अशा दोन्ही गोष्टी मिळून रजनीकांत यांनी तब्बल 210 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच ते भारतातील सर्वांत महागडे अभिनेते ठरले आहेत.
The name is superstar RAJINIKANTH. https://t.co/VrlTr004bu pic.twitter.com/tTmWrKrDP6
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) September 1, 2023
चेकसोबत आलिशान गाडीही भेट
मनोबाला यांनी आणखी एका ट्विटमध्ये अशी माहिती दिली आहे की, ‘जेलर’चे निर्माते कलानिधी मारन यांनी चेकसोबतच रजनीकांत यांना एक आलिशान महागडी गाडीसुद्धा भेट दिली आहे. ही गाडी BMW X7 असल्याचं कळतंय. त्याची बाजारातील किंमत 1.24 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ‘जेलर’च्या प्रचंड यशानंतर कलानिधी यांनी रजनीकांत यांच्याकडे त्यांचा आणखी एक चित्रपट साइन करण्याची विनंती केली आहे.
देशातील सर्वांत महागडे अभिनेत्री ठरले तरी रजनीकांत हे स्वभावाने आजही तितकेच विनम्र आहेत. अभिनेता बनण्याआधी ते बस कंडक्टर म्हणून काम करायचे, हे सर्वांनाच माहीत असेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच बस डेपोला भेट दिली, जिथे त्यांनी कंडक्टरचं काम केलं होतं. त्या डेपोतील कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले.