विजयकांत यांच्या अंत्यदर्शनानंतर रजनीकांत भावूक; पहा व्हिडीओ
कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे विजयकांत यांनी चेन्नईतल्या रुग्णालयात 28 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमलता, दोन मुलं असा परिवार आहे. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना राजकारणापासून लांब राहावं लागलं होतं.
चेन्नई : 30 डिसेंबर 2023 | डीएमडीकेचे संस्थापक आणि दिग्गज अभिनेते विजयकांत यांचं 28 डिसेंबर रोजी चेन्नईमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाविषयीची बातमी कळताच तुतीकोरिन या ठिकाणी आगामी ‘वेत्तायन’ या चित्रपटाचं शूटिंग करणारे रजनीकांत तातडीने चेन्नईला रवाना झाले. कॅप्टन विजयकांत यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पहायला मिळतोय. यामध्ये रजनीकांत भावूक झाल्याचं दिसतंय. विजयकांत यांचा कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. चेन्नईमधल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तुतीकोरिन एअरपोर्टवर माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, “माझं हृदय पिळवटून निघालंय. विजयकांत हे प्रचंड इच्छाशक्ती असणारे होते. मी शेवटचं त्यांना डीएमडीकेच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये पाहिलं होतं. आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना केल्यानंतर ते पुन्हा कमबॅक करतील, असं मला वाटलं होतं. पण त्यांच्या निधनामुळे तमिळनाडूच्या जनतेचं मोठं नुकसान झालंय.”
“आज जर ते निरोगी असते तर राजकीय क्षेत्रात ते एक जबरदस्त शक्ती बनले असते. त्यांनी जनतेसाठी खूप चांगली कामं केली असती. तमिळनाडूच्या लोकांना त्यांना गमावलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशा शब्दांत रजनीकांत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तुतीकोरिन इथून ते चेन्नईला गेले आणि त्यानंतर आयलँड ग्राऊंड्स याठिकाणी त्यांनी विजयकांत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी पुन्हा बोलताना ते म्हणाले, “मी त्यांच्याबद्दल संपूर्ण दिवस बोलू शकतो. त्यांना मी मैत्रीचं प्रतीक मानतो. एकदा तुमची त्यांच्याशी मैत्री झाली की त्यांना विसरणं तुमच्यासाठी सोपं नसेल. त्यांच्या दयाळू स्वभावामुळे लोक अक्षरश: त्यांचे गुलाम होतात. विजयकांत यांच्यासाठी अनेकजण आपले प्राण देण्यासाठीही तयार होतील. ते मित्रपरिवार, राजकारणी आणि माध्यमांवर रागवायचे, पण त्यांच्यावर कोणी रागावू शकत नाही. कारण त्यांच्या क्रोधामागेही योग्य कारण असायचं. त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता. ते धैर्य आणि पराक्रमाचे उदाहरण आहेत.”
Thalaiva Not able to see u cry Tears in my eyes upon seeing this Take care of ur health Thalaiva We love u lots 😔😔#Vijayakanth pic.twitter.com/3zvnj4C2YL
— Dr.Ravi (@imravee) December 29, 2023
विजयकांत यांची एक आठवण रजनीकांत यांनी यावेळी सांगितली. “जेव्हा मी आजारी होतो आणि रामचंद्र रुग्णालयात मला दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा मी शुद्धीवर नव्हतो. आपण चाहते आणि माध्यमांवर नियंत्रण आणू शकत नाही. पण जेव्हा विजयकांत रुग्णालयात मला भेटायला आले, तेव्हा संपूर्ण गर्दी त्यांनी फक्त पाच मिनिटांत नियंत्रणात आणली होती. त्यांनी काय केलं मला माहीत नाही. त्यांनी माझ्या रुमच्या बाजूला त्यांच्यासाठी रुम घेण्याची विनंती केली. मला कोण कोण भेटतंय, हे पाहण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना रुम मागितली होती. मी त्यांची ही मदत कधीच विसरू शकणार नाही”, असं रजनीकांत म्हणाले.