रजनीकांत यांच्या ‘कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याला ड्रग्ज प्रकरणात अटक; स्वत: सेवन करून मित्रांनाही विकायचा
2016 मध्ये त्याने नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. निर्माता म्हणून त्याने तेलुगू भाषेत 'कबाली' हा चित्रपट निर्मित केला. सरदार गब्बरसिंग आणि सितम्मा वाकिट्लो सिरीमल्ले चेट्टू या दोन तेलुगू चित्रपटांसाठी त्याने वितरक म्हणून काम केलं आहे.
हैदराबाद : रजनीकांत यांचा तमिळ चित्रपट ‘कबाली’ हा तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रसिद्ध असलेला टॉलिवूड निर्माता सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी ऊर्फ के. पी. चौधरीला मंगळवारी अटक झाली. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने त्याला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन (ड्रग्ज) जप्त करण्यात आलं आहे. चौधरीचे क्लायंट टॉलिवूड आणि कॉलिवूडसह चित्रपट वर्तुळात आणि बिझनेस वर्तुळातही पसरल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्याने पेटिट इबुझर या नायझेरियन नागरिकाकडून गांजा विकत घेतला होता. या गांजाचं सेवन तो स्वत: करत होता आणि त्यांच्या क्लायंट्सना विकण्यासाठी वापरत होता. के. पी. चौधरीचं कनेक्शन ड्रग किंगपिन एडविन न्यून्सशीही आढळलं आहे, ज्याला HNEW ने यापूर्वी अटक केली होती.
के. पी. चौधरीकडून जप्त केलेल्या साहित्यात 82.75 ग्रॅम कोकेनच्या 90 पिशव्या, 2.05 लाख रुपये, मर्सिडीज आणि मोबाइल फोन यांचा समावेश आहे. या सर्वांची किंमत 78.50 लाख रुपये इतकी आहे. राजेंद्रनगरचे डीसीपी जगदीश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी गोव्यात स्थलांतरित झालेल्या के. पी. चौधरीने तिथे ओएचएम क्लब सुरू होता, असं पोलिसांनी सांगितलं. तो त्याच्या मित्रांसोबत आणि हैदराबादमधील जे सेलिब्रिटी त्याच्या गोव्यातील क्लबला भेट द्यायचे, त्यांच्यासोबत ड्रग्जचं सेवन करायचा. एप्रिल महिन्यात हैदराबादला येताना त्याने पेटिटकडून कोकेनच्या 100 पिशव्या खरेदी केल्या होत्या. त्यापैकी 10 पिशव्या त्याने स्वत:च्या वापरासाठी ठेवून घेतल्या आणि इतर पिशव्या मित्रांना विकण्यासाठी ठेवल्या होत्या.
मंगळवारी तो त्याच्या मर्सिडीजमध्ये उरलेल्या ड्रग्जच्या पिशव्या घेऊन निघालेला, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. तो त्याच्या मित्रांना ड्रग्ज विकण्यासाठी जात असल्याचा संशय पोलिसांना आला. मूळचा खम्मम जिल्ह्यातील असलेला के. पी. चौधरी याने मेकॅनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्याने महाराष्ट्रातील पुणे इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्टर ऑपरेशन्स म्हणून काम केलं आहे.
2016 मध्ये त्याने नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. निर्माता म्हणून त्याने तेलुगू भाषेत ‘कबाली’ हा चित्रपट निर्मित केला. सरदार गब्बरसिंग आणि सितम्मा वाकिट्लो सिरीमल्ले चेट्टू या दोन तेलुगू चित्रपटांसाठी त्याने वितरक म्हणून काम केलं आहे. मात्र चित्रपटसृष्टीत त्याला तोटा सहन करावा लागला. मात्र इंडस्ट्रीत काम करताना त्याने सेलिब्रिटींशी चांगली ओळख करून घेतली.