प्लास्टिक सर्जरीमुळे बदलला राजकुमार रावचा इतका चेहरा? अभिनेत्याने सोडलं मौन
अभिनेता राजकुमार रावचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर त्याने प्लास्टिक सर्जरी करून आपला लूक बदलला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ट्रोलिंगवर अखेर राजकुमारने मौन सोडलं आहे.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या बदललेल्या लूकमुळे तुफान चर्चेत आहे. राजकुमारचा हा नवीन लूक पाहिल्यानंतर त्याने प्लास्टिक सर्जरी केली की काय, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. यावरून त्याला ट्रोलसुद्धा केलं जातंय. अखेर सोशल मीडियावरील वाढती ट्रोलिंग पाहता खुद्द राजकुमारने चर्चांवर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं की त्याच्या फोटोला एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केलं जातंय. “माझी त्वचा इतकी चांगली नाही आणि माझा चेहरासुद्धा इतका रेखीव नाही”, असं म्हणत त्याने ट्रोलर्सचं तोंड गप्प केलंय.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार म्हणाला, “मी कोणतीच प्लास्टिक सर्जरी केली नाही. तो फोटो खूप विचित्र आहे आणि माझ्या मते त्याला एडिट करून व्हायरल केलंय. माझी त्वचा इतकी नितळ आणि सुंदर नाही. कारण हा फोटो खूपच एडिट केलेला वाटतोय आणि त्यावेळी मी चेहऱ्याला मेकअपसुद्धा केला नव्हता. माझाच फोटो पाहिल्यावर मला कसंतरी वाटतंय. ज्याने कोणी एडिटिंग केली, त्याला तेसुद्धा नीट जमलं नाही.”
New Transgender in Town, #RajkummarRao did Plastic Surgery of his Face & spent whopping 70 Lac on his Face ! Look at his Girlish Face ! BC bus yehi daikna Rah gaya tha. pic.twitter.com/SttjV0FVyT
— Umair Sandhu (@UmairSandu) April 14, 2024
“मी प्लास्टिक सर्जरी केलीच नाही. आठ वर्षांपूर्वी मी हनुवटीच्या इथे थोडं फिलर वर्क केलं होतं. कारण त्यावेळी मला कॉन्फीडन्ट दिसायचं होतं आणि माझ्या डर्मेटोलॉजिस्टने मला तसा सल्ला दिला होता. त्यावेळी मी चेहऱ्यावर थोडं फिलर वर्क केलं होतं. पण त्यानंतर मी काहीच केलं नाही”, असंही राजकुमारने स्पष्ट केलं. फिलर वर्क केल्यानंतर दिसण्याबाबतचा आत्मविश्वास वाढल्याने कामाच्या चांगल्या संधीसुद्धा मिळाल्याचं त्याने सांगितलं.
राजकुमारच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘श्रीकांत’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्येही काम करणार आहे. या दोघांचा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.