Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप गंभीर; भावाच्या घरी सात दिवस पूजा, चाहत्यांकडूनही प्रार्थना
राजू लवकर बरे व्हावेत आणि रुग्णालयातून घरी परतावेत यासाठी ही पूजा केली जात आहे. राजू श्रीवास्तव अजूनही आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीशी संबंधित अनेक अपडेट्स दररोज येत आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन 11 दिवस झाले असून त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा होताना दिसत नाही. त्यांच्या प्रकृतीसाठी (Health) देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. आता राजू यांच्या मोठ्या भावाच्या घरीही पूजा ठेवण्यात आली आहे. राजू लवकर बरे व्हावेत आणि रुग्णालयातून घरी परतावेत यासाठी ही पूजा केली जात आहे. राजू श्रीवास्तव अजूनही आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्लीत राजूचा मोठा भाऊ डॉ. सीपी श्रीवास्तव यांनी पत्नी आणि कुटुंबासह घरी विशेष पूजा (Pooja) आयोजित केली आहे. राजू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.
राजूची पत्नी आणि मुलंही पूजेला उपस्थित
गेल्या दोन दिवसांपासून ही पूजा सुरू आहे आणि ते आणखी पाच दिवस चालेल. आठवडाभर राजूच्या स्वास्थ्यासाठी ही पूजा केली जाणार आहे. अनेक मोठे पंडित विधीवत ही पूजा करत आहेत. या पूजेला राजू यांची पत्नी शिखा आणि त्यांची मुलंही उपस्थित आहेत. या पुजेबद्दल राजूचा भाऊ काजू श्रीवास्तव यांचे मेहुणे प्रशांत यांनी सांगितलं होतं की, राजू यांच्यावर देवाची कृपा राहावी म्हणून मी विशेष पूजेचं आयोजन करत आहे आणि तो लवकर बरा होऊन घरी परतला पाहिजे. त्यांनी पुढे सांगितलं की, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, तीन दिवसांपूर्वी राजूच्या मेंदूला सूज आली होती. पण नंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे आणि ती पुन्हा बिघडू नये म्हणून कुटुंबीय पूजा करत आहेत.
एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि ते अजूनही आयसीयूमध्ये आहेत. राजू यांच्या प्रकृतीबद्दल अधिक काही सांगण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. ही रुग्णाची आणि त्यांच्या कुटुंबाची वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे काहीही भाष्य करू शकत नाही, असं ते म्हणाले.