Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांचा ताप कमीच होईना; वाचा तब्येतीचे नवे अपडेट्स
काही दिवसांपूर्वी ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यांचं व्हेंटिलेटरसुद्धा काढण्यात आलं होतं. मात्र आता ताप आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर (ventilator) ठेवण्यात आलं आहे. राजू यांना 100 अंशांवर ताप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यांचं व्हेंटिलेटरसुद्धा काढण्यात आलं होतं. मात्र आता ताप आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर (ventilator) ठेवण्यात आलं आहे. राजू यांना 100 अंशांवर ताप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष देण्यात येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
राजू यांच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. मात्र ताप असल्याने व्हेंटिलेटर न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. राजू यांच्या प्रकृतीसाठी कुटुंबीयांकडून दिवसरात्र प्रार्थना करण्यात येतेय. राजू यांची पत्नी शिखा यांना आयसीयूमध्ये फक्त एकदाच एण्ट्री दिली जातेय. मध्यंतरी जेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, तेव्हा पत्नी आणि मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ताप आल्यापासून फक्त पत्नीलाच दिवसातून एकदा भेटण्याची परवानगी देण्यात येत आहे.
जिममध्ये वर्कआऊट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू अद्याप शुद्धीवर आले नाहीत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देशभरातील चाहत्यांकडून प्रार्थना होत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी दररोज नवीन अपडेट्स समोर येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं होतं.