मुंबई: अभिनेत्री राखी सावंत नुकती ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरातून बाहेर पडली. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर राखीला वाईट बातमी मिळाली. ही बातमी आता तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राखीच्या आईला कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमरचं निदान झाल्याचं राखीने सांगितलं. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईची अवस्था पाहून राखी रुग्णालयातच ढसाढसा रडू लागली.
गेल्या काही दिवसांपासून राखी बिग बॉसच्या घरात होती. रविवारी रात्री या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने सर्वात आधी तिच्या आईची भेट घेतली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राखी म्हणाली, “आल्यावर मला समजलं की आईची तब्येत बरी नाही. आम्ही आता रुग्णालयात आहोत. आईला कॅन्सर आहे आणि आता ब्रेन ट्युमरचंही निदान झालं आहे. तुम्ही कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईला प्रार्थनेची फार गरज आहे.”
त्यानंतर राखीच्या या व्हिडीओत राजेश नावाची एक व्यक्ती येते. राखी त्यांना आईच्या प्रकृतीबद्दल विचारते. ते म्हणतात, “त्यांच्या शरीराची डावी बाजू पॅरालाइज झाली होती. आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन आलो. स्कॅन आणि एमआरआय केल्यानंतर समजलं की त्यांना ब्रेन ट्युमर आहे. त्यांना आधीपासून कॅन्सर तर होताच.”
या व्हिडीओत राखी एका डॉक्टरशीही बोलताना दिसते. आईच्या फुफ्फुसांमध्ये कर्करोग पसरल्याचं डॉक्टर तिला सांगते. पुढील काही चाचण्या झाल्यानंतर त्यांच्यावरील रेडिएशन थेरपी किती आणि कशा पद्धतीने द्यायची, याचा विचार केला जाईल. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.
गायिका अफसाना खान, अभिनेत्री महिमा चौधरी, सोफिया हयात यांनी कमेंट करत राखीच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. राखीच्या अनेक चाहत्यांनीही तिला खचून न जाण्याचं आवाहन केलं. याआधी राखी बिग बॉसच्या 14 व्या पर्वात दिसली होती. या शोमधून मिळालेल्या पैशांनी आईच्या कॅन्सरवर उपचार करणार असल्याचं तिने सांगितलं होतं.