मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी हे येत्या 21 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोघं आधी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी विवाहस्थळ बदलून गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न करण्याचं ठरवलं आहे. साऊथ गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये रकुल आणि जॅकी लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला मोजकेच पाहुणे आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. आयटीसी ग्रँड हा 246 रुम्सचा आलिशान हॉटेल आहे. 45 एकर जमिनीवर पसरलेला हा रिसॉर्ट अत्यंत शांत ठिकाणी आहे. जॅकी आणि रकुलने या हॉटेलची निवड करताच अनेकांना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मेक माय ट्रिप’नुसार (Makemytrip.com) गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये एका रुमची किंमत 19 हजार रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. यात इतक टॅक्सचाही समावेश आहे. रकुल आणि जॅकी यांनी ऐनवेळी विवाहस्थळ बदलल्यानंतर गोव्यातील या हॉटेलद्वारे लग्नाची सर्व तयारी व्यवस्थित केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. गोव्यात तीन दिवस हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. हे लग्न पूर्णपणे इको फ्रेंडली असेल, असंही कळतंय. “रकुल आणि जॅकीने कोणत्याच पाहुण्यांना कागदी लग्नपत्रिका दिलेली नाही. त्याचप्रमाणे विवाहस्थळी कोणतेच फटाके फोडले जाणार नाहीत”, असं इव्हेंट मॅनेजरकडून स्पष्ट करण्यात आलंय.
रकुल प्रीत आणि जॅकीने ऑक्टोबर 2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. हे दोघं एकमेकांचे शेजारी असल्याने लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. “आमची मैत्री आणि नातं अत्यंत सहजपणे सुरु झालं होतं. आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि तीन-चार महिन्यांतच आम्हाला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली होती. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत हे आम्हाला सुरुवातीला माहीतसुद्धा नव्हतं. इतक्या वर्षांत आमच्यात कधी मैत्रीसुद्धा झाली नव्हती. पण लॉकडाऊनमध्ये सर्वकाही जुळून आलं”, असं तिने सांगितलं होतं.