रामचरणची पत्नी दुसऱ्यांदा आई होण्यास तयार; 8 महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. मात्र बाळाच्या निर्णयासाठी दोघांनी मिळून वेळ घेतला. अखेर लग्नाच्या 11 वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याआधी उपासना आई न होण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती.
हैदराबाद : 23 फेब्रुवारी 2024 | साऊथ सुपरस्टार रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला हे गेल्या वर्षी जून महिन्यात आई-बाबा झाले. उपासनाने मुलीला जन्म दिला आणि त्यांनी तिचं नाव क्लिन कारा असं ठेवलंय. आता दुसऱ्या बाळासाठीही तयार असल्याचं वक्तव्य उपासनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलंय. हैदराबादमधील एका कार्यक्रमात ती बोलत होती. यावेळी महिलांचं आरोग्य, गरोदरपण आणि दुसऱ्यांदा आई बनण्याची तयारी यांविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.
महिलांच्या आरोग्याविषयी बोलताना उपासना म्हणाली, “माझ्या मते आपलं आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपण स्वत:ला प्राधान्य दिलं पाहिजे. जर आपणच आपली काळजी घेतली नाही, तर दुसरं कोणीच आपली काळजी घेणार नाही. मला खरंच असं वाटतं की इतके उपाय असताना महिलांनी कोणताच त्रास सहन करू नये. आपल्याला आपल्या आयुष्यात कधी आणि काय हवंय याचा निर्णय महिला स्वत: घेऊ शकतात.”
वयाच्या 34 व्या वर्षी मुलीला जन्म देण्याविषयी उपासना पुढे म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात उशीरा आई होण्याचा निर्णय घेतला आणि मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो माझा निर्णय होता आणि त्यानुसार मी केलं. मी आता दुसऱ्यांदा आई होण्यासाठीही तयार आहे, जर माझे डॉक्टर होकार देत असतील तर. माझं आरोग्य, माझा निर्णय.” उपासनाच्या या वक्तव्यानंतर ती पुन्हा बेबी प्लॅनिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
View this post on Instagram
रामचरण आणि उपासना हे बरेच वर्ष एकमेकांचे चांगले मित्र होते. 2011 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर 20 जून 2023 रोजी रामचरण आणि उपासनाच्या घरात पहिल्यांदा पाळणा हलला. सोशल मीडियावर या दोघांनी मुलीचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. रामचरण सध्या ‘गेम चेंजर’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यामध्ये तो अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत भूमिका साकारणार आहे. यावर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रामचरण आणि उपासना हे हैदराबादमध्ये वेगळे राहत होते. मात्र बाळाच्या जन्मानंतर दोघांनी चिरंजीवी आणि सुरेखा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना उपासना एका मुलाखतीत म्हणाली होती, “अनेकजण मुलंबाळं झाल्यानंतर घराबाहेर पडतात. पण आम्ही याविरुद्ध करतोय. आतापर्यंत आम्ही दोघंच राहत होतो. पण बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्ही रामचरणच्या कुटुंबीयांसोबत राहणार आहोत. बाळासाठी आजी-आजोबाचं महत्त्व खूप असतं. हे मला आणि रामचरणला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आमच्या बाळालाही आजी-आजोबाचं भरभरून प्रेम मिळावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”