मुंबई : निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे त्यांच्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत काही ट्विट्स केले आहेत. हे त्यांचे ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. देशभरात वाद सुरू असलेल्या या चित्रपटाचं समर्थन करतानाच त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या यशाबाबत बॉलिवूडने बाळगलेल्या मौनावरून त्यांनी चपराक लगावली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. तिसऱ्या आठवड्याअखेर या चित्रपटाने 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. देशभरातील वाद, विरोध, बॉयकॉट आणि समर्थन यांमध्ये अडकलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमधून बॉलिवूडला आरसा दाखवला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत त्यांनी काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘आपण इतरांशी आणि स्वत:शी खोटं बोलण्यात इतके सहज झालो आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य दाखवतो, तेव्हा आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरळ स्टोरी’च्या जबरदस्त यशावर बॉलिवूडचं मृत्यूसारखं मौन सर्वकाही स्पष्ट करतोय.’
We are so comfortable in telling lies to both others and ourselves that when someone goes ahead and shows the truth we get SHOCKED..That explains the DEATH like SILENCE of BOLLYWOOD on the SHATTERING SUCCESS of #KeralaStory
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 21, 2023
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘द केरळ स्टोरी हा चित्रपट एका सुंदर आणि तितक्याच भितीदायक आरशाप्रमाणे आहे, जो मुख्य प्रवाहातील बॉलिवूडच्या मृत चेहऱ्याला त्याच्या सर्व कुरुपतेसह दाखवतोय. हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रत्येक कॉर्पोरेट हाऊस आणि प्रत्येक स्टोरी डिस्कशन रुममध्ये एका गूढ धुक्याप्रमाणे घाबरवेल.’
The #KeralaStory is like a BEAUTIFUL GHOSTLY MIRROR showing the DEAD face of Main stream BOLLYWOOD to itself in all its UGLINESS
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 21, 2023
The #KeralaStory will haunt like a mysterious fog in every story discussion room and every corporate house in BOLLYWOOD forever
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 21, 2023
इतकंच नव्हे तर त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘द केरळ स्टोरी या चित्रपटापासून शिकवण घेणं खूप कठीण आहे कारण खोट्याची नक्कल करणं सोपं असतं पण सत्याची नक्कल करणं खूप कठीण असतं.’
It’s difficult to learn from #KeralaStory because it’s EASY to copy a LIE but very DIFFICULT to copy TRUTH
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 21, 2023
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असला तरी देशभरात त्यावरून अद्याप वाद सुरूच आहे. चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात येतंय. यावर अखेर दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी मौन सोडलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळलं आहे. चित्रपटाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी केरळमधल्या काही पीडित मुलींनाही मंचावर सर्वांसमोर आणलं होतं.