जिला म्हणायचा वहिनी तिच्यावरच जडलं प्रेम; कुटुंबीयांनी नाकारलं तर अभिनेत्याने पळून मंदिरात केलं लग्न
मालिका किंवा चित्रपटात एकत्र काम करताना सहकलाकाराच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना आजवर पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. अशीच काहीशी या अभिनेत्याची लव्ह स्टोरी आहे. ऑनस्क्रीन वहिनी साकारणाऱ्या मराठी अभिनेत्रीवर त्याचं प्रेम जडलं होतं.
राम कपूर हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तंवरसोबत काम केलं होतं. या मालिकेच्या आधीही बऱ्याच वर्षांपासून तो टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होता. 1997 मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 2000 मध्ये ‘घर एक मंदिर’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. याच मालिकेच्या सेटवर रामला त्याची जोडीदारसुद्धा सापडली.
राम कपूरचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी नवी दिल्लीत झाला. रामच्या वडिलांचं नाव अनिल कपूर आणि आईचं नाव रिता कपूर आहे. रामच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अभिनेत्री गौतमी कपूरशी लग्न केलंय. हे दोघं ‘घर एक मंदिर’ या मालिकेत दीर आणि वहिनीच्या भूमिकेत होते. एकाच मालिकेत काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र गौतमीचं रामसोबत दुसरं लग्न होतं. त्याआधी तिने व्यावसायिक फोटोग्राफर मधूर श्रॉफशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नव्हतं.
View this post on Instagram
राम हा पंजाबी कुटुंबातील असून गौतमी ही मराठी कुटुंबातील आहे. या दोघांनी जेव्हा त्यांच्या नात्यावर घरात सांगितलं, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांकडून लग्नाला परवानगी नव्हती. तरीही राम आणि गौतमी हे एकमेकांशीच लग्न करण्यावर ठाम होते. अखेर 14 फेब्रुवारी 2003 रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं. या दोघांना सिया ही मुलगी आणि अक्स हा मुलगा आहे.
राम कपूरने ‘बडे अच्छे लगते है’ आणि ‘घर एक मंदिर’ या मालिकांशिवाय ‘लिपस्टिक’, ‘कहता है दिल’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. याशिवाय त्याने काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘कुछ ना कहो’, ‘फनाह’, ‘उडान’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘एजंट विनोद’, ‘हमशक्ल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय.