‘राम सेतू’, ‘थँक गॉड’ने दिली पहिल्या वीकेंडची अग्निपरीक्षा; कोणी मारली बाजी?
अक्षय कुमार-अजय देवगणची बॉक्स ऑफिसवर टक्कर; जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची कमाई..
मुंबई- दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळाली. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ आणि अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या वर्षभरातील काही मोजके चित्रपट सोडल्यास बॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली. त्यामुळे राम सेतू आणि थँक गॉडकडून थोड्याफार अपेक्षा होत्या. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्या आठवड्यात अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ आघाडीवर आहे.
अक्षय कुमारच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 कोटींची चांगली कमाई केली होती. मात्र दिवाळी सुट्ट्यांचा फारसा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाल्याचं पहायला मिळालं नाही. शुक्रवारी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली. तर शनिवारी राम सेतूने 7.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाने आठवड्याभरात 50 कोटींचा टप्पा गाठला आहे.
दुसरीकडे अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘थँक गॉड’ने प्रेक्षकांची पुरती निराशा केली आहे. पहिल्या दिवशी थँक गॉडने 8.15 कोटी रुपये कमावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हा आकडा 6 कोटींवर आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यात आणखी घट झाली आणि कमाईचा आकडा दोन कोटींवर आला.
पहिल्या आठवड्यात दोन्ही चित्रपटांची कमाई ही अपेक्षेपेक्षा कमीच झाली आहे. मात्र त्यातल्या त्यात ‘राम सेतू’ची कमाई ठीकठाक होत आहे. मात्र 100 कोटींचा टप्पा गाठणं दोन्ही चित्रपटांसाठी अवघड असल्याचं दिसत आहे.
राम सेतू या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्या भूमिका आहेत. तर थँक गॉडमध्ये अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत रकुल प्रीत सिंगची भूमिका आहे.