तुमच्याकडून ही अपेक्षा नाही..; महात्मा गांधींबद्दल ‘लक्ष्मण’ यांचं वक्तव्य ऐकून नेटकरी नाराज
'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी महात्मा गांधींबद्दल जे वक्तव्य केलं, ते अनेकांना रुचलं नाही. सुनील लहरी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले होते. या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली होती तर अभिनेते सुनील लहरी हे लक्ष्मणाच्या भूमिकेत होते. नुकतंच त्यांनी गांधी जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित व्हिडीओ शेअर केला होता. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना 2 ऑक्टोबरच्या शुभेच्छा दिल्या होत्या. व्हिडीओमध्ये सुनील लहरी हे लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी या दोघांबद्दल बोलत होते. मात्र त्यात त्यांनी महात्मा गांधींबद्दल जे वक्तव्य केलं होतं, त्यात नेटकऱ्यांना प्रशंसा कमी आणि व्यंग अधिक जाणवलं होतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुनील लहरी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
‘2 ऑक्टोबर रोजी दोन अशा महान व्यक्तिमत्त्वांचा जन्मदिन आहे, ज्यांना आपला देश नेहमीच स्मरणात ठेवेल. एकाने संपूर्ण देशाला ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला, तर दुसऱ्याने तीन माकड आणि कोणी एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करण्याची शिकवण दिली. या गोष्टीची माझी एक वेगळी व्याख्या आहे’, अशी पोस्ट सुनील लहरी यांनी लिहिली होती.
या पोस्टसोबतच त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते पुढे म्हणतायत, “आज दोन महान व्यक्तिमत्त्वांचा जन्मदिन आहे. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त सर्व देशवासियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. या महापुरुषांपैकी पहिले म्हणजे आपले दिवंगत पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्याला जय जवान, जय किसानचा नारा दिला आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी आपल्याला तीन माकडं दिली आणि त्यांनी सांगितलं की वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका. आज आपला देश यामुळे त्रस्त आहे. दडपशाही सहन करणं, तुमच्या एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा, असं गांधींनी सांगितलं होतं.”
2 अक्टूबर 2 ऐसी महान शख़्सियत का जन्म दिवस जो हमेशा देश याद रखेगा.1ने जय जवान जय किसान का नारा दिया और 2रे ने तीन बंदर, साथ ही कोई 1 गाल पर थप्पड़ मारे तो 2रा गाल भी आगे कर दो थप्पड़ के लिये. 2nd Oct.Birth anniversary of 2 great personalities whom, country will always remember. pic.twitter.com/flz5B61uIN
— Sunil lahri (@LahriSunil) October 2, 2024
सुनील लहरी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘गांधीजींबद्दल अशा पद्धतीने बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला हे शोभत नाही’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘सुनील सर तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही’, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. नेटकऱ्यांची नाराजी पाहिल्यानंतर सुनील लहरी यांनी एका कमेंटवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं, ‘मी तुमच्या भावनांचा आदर करतो. आपण लोकतांत्रिक देशाचे नागरिक आहोत आणि इथे प्रत्येकाला एखाद्या व्यक्तीबद्दल विचार मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे, ती माझ्यासाठी चुकीची असेल आणि तुमच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की मला राजकारणात जराही रस नाही.’