Adipurush | ‘रावणाचा हेअरकट विराट कोहलीसारखा, हे लज्जास्पद’; रामायणातील ‘लक्ष्मणा’ची ‘आदिपुरुष’वर सडकून टीका
चित्रपटातील काही डायलॉग्सवर आक्षेप घेतल्यानंतर 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावरही सुनील लहरी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आता जरी ते संवाद काढले तरी प्रेक्षकांच्या मनावर झालेली जखम तशीच राहणार आहे."
मुंबई : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या तुफान गाजलेल्या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नुकताच त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहिला, त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “चित्रपटात ग्राफीक्स आहे, एखाद्या पेंटिंगसारखा हा चित्रपट वाटतो. पण कथा आणि भावनेच्या बाबतीत तो शून्य आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणासाठी हा चित्रपट बनवला, हे मी समजू शकलो नाही. त्यात कथा नाही, व्यक्तीचित्रण नाही. सगळा काही गोंधळ आहे. काहीतरी वेगळं दाखवण्याच्या नावाखाली त्यांनी सत्यानाश केला आहे”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“रावणाचा हेअरकट विराट कोहलीसारखा”
“आदिपुरुषमध्ये राम आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत काहीच फरक दिसत नाही. दोघं एकसारखेच वागताना दिसतात. रावणाला तर लोहारच बनवून टाकलं आहे. त्याची गरज काय होती? मेघनादच्या अंगावर टॅटू दाखवले आहेत तर सर्व पात्रांची हेअरस्टाइल विचित्र आहे. रावणाचा हेअरकट विराट कोहलीसारखा वाटतो. हे सर्व लज्जास्पद आहे”, असं ते म्हणाले.
“मॉडर्नायझेशनसाठी काहीही करणार का?”
‘आदिपुरुष’मध्ये रामायणाची कथा दाखवताना काही गोष्टी बदलल्या पाहिजे नव्हत्या, असं मत त्यांनी मांडलं. “रावणाच्या पुष्पक विमानाच्या जागी वटवाघूळ दाखवण्यात आला आहे. हनुमानाच्या खांद्यावर बसून श्रीराम लढाई करताना दिसत आहेत. काही सीन्स नाट्यमय करण्यासाठी त्यांनी लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील लढाई पाण्यात दाखवली. लॉकडाऊनदरम्यान जेव्हा लोक घरी अडकले होते, तेव्हा त्यांनी रामायण पुन्हा पाहण्यासाठी निवडलं. त्यावेळी मालिकेची रेटिंग सर्वाधिक होती. ते पाहण्यासाठी कोणावर कसलाच दबाव नव्हता. पण सर्व वयोगटातील लोकांनी तो पाहिला आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आताची तरुण मंडळीसुद्धा माझे चाहते आहेत. तुम्ही मॉडर्नायझेशनसाठी काहीही करणार का”, असा सवाल त्यांनी आदिपुरुषच्या निर्मात्यांना केला.
‘आदिपुरुष’मधील डायलॉग्सवर काय म्हणाले?
चित्रपटातील काही डायलॉग्सवर आक्षेप घेतल्यानंतर ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावरही सुनील लहरी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आता जरी ते संवाद काढले तरी प्रेक्षकांच्या मनावर झालेली जखम तशीच राहणार आहे. त्यांनी असं अपमानास्पद काम केलंच पाहिजे नव्हतं. हनुमानासारख्या भूमिकेच्या तोंडी ‘तेरे बाप की जलेगी’ असे संवाद आणि मेघनाद म्हणतो ‘चल निकल’, ही तर हद्दच झाली. ही टपोरी भाषासुद्धा नाही. ते नेमका कसला विचार करत होते?”
“आदिपुरुषच्या टीमने प्रेक्षकांची माफी मागितली पाहिजे”
“टी-सीरिजचं मूळ भक्तीत आहे. प्रभास आणि सैफ अली खानने स्क्रिप्टमध्ये बदलाची मागणी केली पाहिजे होती. हा चित्रपट प्रदर्शित झालाच कसा, याचं मला आश्चर्य वाटतं. मनोज मुंतशीर हे संस्कृती आणि धर्माचा खूप आदर करतात. त्यांनीच असे संवाद लिहिले? मला खरंच असं वाटतं की हा चित्रपट बनवताना प्रत्येकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती किंवा त्यांना संमोहित केलं होतं. म्हणूनच त्यांनी असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हे खूप दु:खदायक आहे. माझ्या मते त्या सर्वांनी प्रेक्षकांची माफी मागितली पाहिजे. या चित्रपटावर बंदी आणली पाहिजे”, अशी मागणी लहरी यांनी केली.