मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून मोठा वाद अद्याप सुरूच आहे. या चित्रपटातील कलाकारांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्सवरून प्रेक्षकांनी प्रचंड टीका केली. काही ठिकाणी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. रामायण या महाकाव्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेशी होऊ लागली आहे. यादरम्यान आता ‘रामायण’ या मालिकेवरून झालेला मोठा वादसुद्धा चर्चेत आला आहे. हा वाद इतका मोठा होता की जवळपास दोन वर्षे मालिकेवर बंदी होती. निर्मात्यांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर मालिका पुन्हा सुरू केली. या वादामागचं कारण होतं मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी परिधान केलेला ब्लाऊज.
‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी हा जुना किस्सा सांगितला आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मालिकेशी संबंधित वादाचा उल्लेख केला. या वादामुळे मालिकेला टेलिकास्ट करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला होता. सुनील लहरी यांनी सांगितलं की मालिकेला टेलिकास्ट करण्यासाची परवानगी मिळवण्यासाठी रामानंद सागर यांनी तीन पायलट शूट केले होते. हे शूटिंग यासाठी केलं होतं कारण मालिकेला टेलिकास्ट करणं खूप कठीण झालं होतं. प्रत्येकाची त्यावर नजर होती. इतकंच नव्हे तर टेलिकास्टच्या परवानगीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही सहभागी केलं होतं. मालिकेच्या टेलिकास्टसाठी निर्मात्यांना फार प्रयत्न करावे लागले होते.
सुनील लहरी यांनी पुढे सांगितलं की मंत्रालयाने सीतेच्या ब्लाऊजवरून आक्षेप घेतला होता आणि सांगितलं होतं की सीता मातेला कट स्लीव्ह ब्लाऊजमध्ये दाखवू शकत नाही. दूरदर्शनकडूनही त्याला विरोध करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर मालिकेच्या टेलिकास्टलाही रोखण्यात आलं होतं. त्यानंतर रामानंद सागर यांनी पुन्हा एकदा सीतेच्या पोशाखावर काम केलं आणि फुल स्लीव्ह ब्लाऊजचे कपडे डिझाइन केले. या मुद्द्यामुळे मालिकेचं टेलिकास्ट जवळपास दोन वर्षांपर्यंत थांबवलं होतं.