अरुण गोविल-दीपिका चिखलिया एकत्र; ‘वीर मुरारबाजी’मध्ये साकारणार ऐतिहासिक भूमिका
'रामायण' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची जोडी आता एका चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. 'वीर मुरारबाजी' या चित्रपटात दोघं महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरात-मनामनात ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचं एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे.
ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघं सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.
पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.




रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आजही ही जोडी लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हासुद्धा प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.