Adipurush | ‘आदिपुरुष’च्या वादावर रामायणातील सीतेची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाल्या “पैसे कमावण्यासाठी..”
रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लॉकडाऊनदरम्यान हीच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पुनर्प्रक्षेपित करण्यात आली होती. पैसे कमावण्यासाठी ही मालिका बनवण्यात आली नव्हती, असं दीपिका यावेळी म्हणाल्या.
मुंबई : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारून अभिनेत्री दीपिका चिखलिया घराघरात पोहोचल्या. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाविषयी आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामाणय या महाकाव्यावर आधारित आहे. मात्र यातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्स यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ हा चित्रपट असल्याची टीका अनेकांकडून होत आहे. “रामायण हे मनोरंजनासाठी नाही” अशी प्रतिक्रिया आता दीपिका यांनी दिली आहे.
“रामायण मनोरंजनासाठी नाही”
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “प्रत्येक वेळी ही कथा स्क्रीनवर सांगितली जाणार, मग ते टीव्हीच्या माध्यमातून असो किंवा चित्रपटाच्या.. मात्र प्रत्येक वेळी त्यात असं काहीतरी असेलच, ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. कारण आम्ही ज्याप्रकारे रामायणाची प्रतिकृती बनवली होती, तसं तुम्ही बनवू शकणार नाही. पण मला खरंच या गोष्टीचं दु:ख होतं की दर वर्षी किंवा दर दोन वर्षांनी रामायण बनवण्याचा हा अट्टहास का? रामायण हे काही मनोरंजनासाठी नाही. रामायणातून तुम्ही काहीतरी शिकवण घेऊ शकता. हे एक पुस्तक आहे, जे पिढ्यानपिढ्यांपासून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि हीच आपली संस्कारमूल्ये आहेत.”
“इतक्यात तरी आदिपुरुष पाहणार नाही”
दीपिका यांनी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अद्याप पाहिला नाही. या चित्रपटावरून सुरू असलेला वाद, नकारात्मक प्रतिक्रिया आणि कामाचं व्यग्र वेळापत्रक यांमुळे इतक्यात तरी हा चित्रपट पाहता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. “कदाचित नकारात्मक प्रतिक्रियांमुळे माझी बघण्याची इच्छा होत नसावी. त्याचसोबत मी शूटिंगमध्येही व्यग्र आहे. जेव्हा मी तो चित्रपट पाहीन, तेव्हा त्यावर आणखी चांगलं मत मांडू शकेन. अनेकजण माझ्याकडे त्या चित्रपटाबद्दल मतं मांडत आहेत”, असं त्या म्हणाल्या.
“..म्हणून रामायण मालिकेवर आजही प्रेमाचा वर्षाव होतो”
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लॉकडाऊनदरम्यान हीच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पुनर्प्रक्षेपित करण्यात आली होती. पैसे कमावण्यासाठी ही मालिका बनवण्यात आली नव्हती, असं दीपिका यावेळी म्हणाल्या. त्याचसोबत रामायणाची कथा ही पूजनीय असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“राम आणि हनुमान हे अमेरिकन सुपरहिरोसारखे नाहीत. त्यांची आपण पूजा करतो. आपल्या इतिहासाचा ते भाग आहेत. रामायण या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या भूमिका साकारल्या होत्या. म्हणूनच आजसुद्धा या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं”, असंही त्यांनी नमूद केलं.