एक्झिट पोल्सचे सर्व निकष आणि अंदाज खोटे ठरवत मतदारांनी लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा वर्षांनी पहिल्यांदाच संमिश्र कौल दिला. एनडीएला 400 चा आकडा दूरच, पण 300 चा आकडाही पार करता आला नाही. तर भाजपला 250 जागांच्या पुढे मजल मारता आली नाही. बहुमताच्या जोरावर एनडीएच पुढील सरकार स्थापन करणार हे निश्चित असलं तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा आघाडी सरकार येणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने अनपेक्षित मुसंडी मारली. काँग्रेस पक्ष दहा वर्षांनी पहिल्यांदाच 100 पार गेला. तर इंडिया आघाडीने 200 पार मजल मारली. राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला. ही बाब बरंच काही दर्शवून गेली. यावर आता कलाविश्वातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनी निवडणूक निकालावर निराशा व्यक्त केली. इन्स्टाग्रामवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी नाराजी बोलून दाखवली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘निवडणूक निकाल पाहून खूप निराशा झाली. एक तर मतदान कमी आणि असा निकाल.. परंतु एका गोष्टीचा आनंद झाला. माझे दोन आवडते व्यक्ती या निवडणुकीत विजयी ठरले. या दोघांना खूप शुभेच्छा.’ सुनील यांनी अभिनेत्री कंगना राणौत आणि ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारलेले अरुण गोविल यांना या शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील म्हणाले, “निवडणुकीचे निकाल पाहून माझी खूप निराशा झाली. मी लोकांना म्हणूनच आवाहन करत होतो की मतदान करा, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही. आता आघाडीचं सरकार येणार. हे आघाडीचं सरकार पाच वर्षे टीकणार का? असो, मला या एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या दोन लोकांना मी पसंत करतो, ते जिंकले आहेत. कंगना राणौत ही नारीशक्तीचं स्वरुप आहे, ती मंडीमधून जिंकली आहे. दुसरे माझे बंधुसमान अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक जिंकले आहेत.”
अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं, ‘कधी कधी विचार करतो की प्रामाणिक व्यक्तीने खूप जास्त प्रामाणिक राहू नये. जंगलात सरळ असणारी झाडंच सर्वात आधी कापली जातात. सर्वांत जास्त प्रामाणिक असलेल्या व्यक्तीलाच सर्वाधिक कष्ट सहन करावे लागतात. परंतु तरीही तो प्रामाणिकपणा सोडत नाही. म्हणूनच ती व्यक्ती कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा बनते.’