सध्या देशभरात एकाच लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. देशातील हा सर्वांत महागडा लग्नसोहळा असून त्याला अनेक नामांकित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंबानींचा कार्यक्रम आणि त्याला बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार नाहीत, असं होणारच नाही. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानपासून सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे असे असंख्य कलाकार प्री-वेडिंग कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत. नुकताच अनंत-राधिकाचा संगीत समारंभ पार पडला. या संगीत कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी डान्स केला. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्टच्या डान्सचा आहे.
रणबीरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातील गाण्यावर दोघांनी डान्स केला आहे. मात्र त्यांच्या डान्सने सोशल मीडियावर ट्रोलर्सना आमंत्रण दिलं आहे. ‘रणबीरचं असं म्हणणं असेल की मी इथे माझी ऊर्जा वाया घालवणार नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या दोघांमध्ये काही केमिस्ट्रीच नाही. त्यांना बळजबरीने नाचायला लावल्यासारखं दिसतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अंबानींकडून सर्वांत कमी पैसा यांनाच मिळाला असेल’, अशीही खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली आहे.
अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमात सारा अली खान, जान्हवी कपूर, शिखर पहाडिया, वीर पहाडिया, तेजस ठाकरे यांनीसुद्धा डान्स केला. या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू आहेत. आधी जामनगरमध्ये तीन दिवसांचं प्री-वेडिंग आणि त्यानंतर क्रूझवर तीन दिवसांच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या विविध कार्यक्रमांना रिहाना, जस्टीन बिबर, केटी पेरी, बॅकस्ट्रीट बॉइज यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी परफॉर्म केलं होतं. यासाठी अंबानींकडून त्यांना बक्कळ मानधन मिळालं आहे.