मुंबई : 8 जानेवारी 2024 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. तगडा गल्ला जमवण्यात जरी हा चित्रपट यशस्वी ठरला असला तरी सोशल मीडियावर अनेकांनी त्यातील सीन्स, गाणी, डायलॉग्स यांवरून तीव्र आक्षेप नोंदवला होता. नुकतीच या चित्रपटाच्या यशानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूरने ‘ॲनिमल’च्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ॲनिमल’ हा चित्रपट स्त्रीविरोधी आणि अत्यंत हिंसक असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
शनिवारी रात्री मुंबईत ‘ॲनिमल’च्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रणबीरने सर्वांत आधी दिग्दर्शकांचे आभार मानले. “‘ॲनिमल’चा यश साजरा करण्यासाठी इथे जमलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. या चित्रपटाबद्दल काही जणांना समस्या होती पण माझ्या मते जे प्रेम, यश आणि बॉक्स ऑफिसचे आकडे या चित्रपटाला मिळाले आहेत, त्यावरून हे सिद्ध होतंय की चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीच नाही. चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही”, अशी प्रतिक्रिया रणबीरने दिली.
‘ॲनिमल’च्या या सक्सेस पार्टीमध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासह ‘ॲनिमल’चे कलाकार अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, प्रेम चोप्रा, सुरेश ओबेरॉय, सौरभ सचदेव आणि सिद्धार्थ कर्णिक हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शकांनीही चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्सचे आभार मानले. “चित्रपटातील प्रत्येक भूमिका खूप खास आहे आणि हे सर्व प्रत्येकाच्या कठोर मेहनतीमुळे शक्य झालं आहे. निर्माते, गीतकार, संगीतकार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो”, असं संदीप म्हणाला.
अभिनेता बॉबी देओलने या चित्रपटात जबरदस्त काम केल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. या पार्टीमध्ये त्यानेसुद्धा चित्रपटाच्या यशावर प्रतिक्रिया दिली. “हे खूपच भारी आहे आणि संदीप रेड्डी वांगाशिवाय हे शक्यच झालं नसतं. एखादा चित्रपट इतक्या ताकदीने उभा करण्याची ताकद फक्त त्याच्यातच आहे”, असं बॉबी म्हणाला. अभिनेत्री तृप्ती डिमरीनेही दिग्दर्शकांचे आभार मानले. तर अनिल कपूर यांनी रश्मिका मंदानाला ‘लकी मॅस्कॉट’ असं म्हटलंय.