“ऐकू येतंय, मी बहिरा नाही..”; अवॉर्ड शोमध्ये करण जोहरवर भडकला रणबीर कपूर
अभिनेता रणबीर कपूर आणि करण जोहर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर करणवर जोरात ओरडताना दिसतोय. 'ऐकू येतंय, बहिरा नाही मी' असं रणबीर म्हणतो आणि त्याचा राग पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींनी त्यावर आक्षेप नोंदवला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका पुरस्कार सोहळ्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर जोरात ओरडताना दिसतोय. रणबीरचं हे वागणं पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
रणबीर आणि करणचा हा व्हिडीओ गुजरातमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील आहे. करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराना हे दोघं मिळून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की करण रणबीरची मदत मागत असतो. “रणबीरच करू शकतो, रणबीरच करणार आणि रणबीरला केलं पाहिजे, रणबीरने आमची मदत केली पाहिजे”, असं तो म्हणतो. हे ऐकून रणबीर चिडून करणला म्हणतो, “सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूँ मैं”. रणबीरच्या ॲनिमल चित्रपटातील हा डायलॉग आहे. मात्र ज्याप्रकारे तो ओरडतो, ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो.
View this post on Instagram
रणबीरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात त्याच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पिता-पुत्राच्या नात्याबद्दलची अनोखी कथा दाखवणारा हा चित्रपट आहे. ॲनिमलच्या यशानंतर रणबीरच्या आगामी प्रोजेक्टची नुकतीच घोषणा झाली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात तो पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय ॲनिमलचा सीक्वेलसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. इतकंच नव्हे तर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचंही कळतंय.
‘ॲनिमल’ या चित्रपटासाठी रणबीरला नुकताच एक पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार मानत रणबीर म्हणाला होता, “मला मुकेश अंबानी यांनी एकदा सांगितलं होतं की यश किंवा अपयश या गोष्टींचा स्वत:वर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यामुळे माझं पहिलं लक्ष्य हेच आहे की चांगलं काम करत राहणं. मी माझ्या आयुष्यात मुकेश भाईंकडून बरेच सल्ले घेतले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपण आपली मान खाली करावी आणि काम करत राहावं. यशाला डोक्यावर आणि अपयशाला मनावर कधीच घेऊ नये.”