National Awards : ऋषी कपूर यांच्याशी रणबीरची तुलना; नॅशनल अवॉर्डदरम्यान अभिनेत्याने असं केलं तरी काय?
69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नवी दिल्लीत पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत आली होती. या कार्यक्रमातील रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील दमदार कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता आणि पती रणबीर कपूरसोबत आलिया पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती. या कार्यक्रमातील रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीरचं वागणं पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची तुलना दिवंगत अभिनेते आणि वडील ऋषी कपूर यांच्याशी केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दुसऱ्याच पंक्तीत रणबीर आणि आलिया बसले होते. तर त्यांच्या समोरच पहिल्या पंक्तीत ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान बसल्या होत्या. वहीदा यांचे फोटो क्लिक करण्यासाठी त्याठिकाणी पापाराझींमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी फोटोग्राफरचा धक्का वहीदा यांच्या टेबलला लागला. टेबलचा मार त्यांना लागला असता, मात्र इतक्यात मागे बसलेला रणबीर उभा राहिला आणि त्याने फोटोग्राफर्सना विनंती केली. “काळजी घ्या जरा, मागे लक्ष द्या”, असं तो त्यांना सांगतो. रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘यालाच संस्कार म्हणतात’, असं एकाने म्हटलंय. तर ‘जे त्याचे वडील करायचे, तेच आता तो करतोय’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. कमेंट बॉक्समध्ये काहींनी रणबीरच्या सनग्लासेसवरूनही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘रणबीरने गॉगल का लावला आहे’, असा सवाल नेटकऱ्यांनी केला.
वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. वहीदा मंचावर पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी वहीदा भावूक झाल्या होत्या. तर दुसरीकडे आलिया भट्ट राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिच्या लग्नाची साडी नेसून आली होती.
विजेत्यांची यादी-
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)