‘रामायण’ चित्रपटात रणबीर साकारणार प्रभू श्रीराम; सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री
नितेश तिवारी यांनी त्यांच्या 'रामायण' चित्रपटासाठी स्टारकास्ट निश्चित केली आहे. रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असून सीतेच्या भूमिकेत एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला निश्चित करण्यात आलं आहे. काही महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
मुंबई : 1 फेब्रुवारी 2024 | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. तर सीता, हनुमान आणि रावण या भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता चित्रपटातील स्टारकास्टविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. रणबीरच्या नावावरूनही बराच संभ्रम होता. मात्र तोच श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र रणबीरसोबत अभिनेत्री आलिया भट्ट सीतेच्या भूमिकेत नसून एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची त्यासाठी निवड झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साई पल्लवी आहे.
याशिवाय चित्रपटातील इतरही भूमिकांवरून पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.
View this post on Instagram
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. रणबीर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट हे दोघं राम-सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला निश्चित केल्याचं समजतंय. श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीरसुद्धा तयारी करत आहे. त्याने मांसाहार, मद्यपान आणि सिगारेट सोडून दिसल्याचं कळतंय.
यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.