मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : रणदीप हुड्डा हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने हिंदीसोबतच काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीपने त्याच्या ‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला. अवघ्या वीस दिवसांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट बंद करण्यात आला होता. याला अभिनेता अक्षय कुमार कारणीभूत होता. तब्बल तीन वर्षे मेहनत केल्यानंतर प्रोजेक्ट रखडल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचं रणदीपने या मुलाखतीत सांगितलं. डिप्रेशनचा हा काळ खूप मोठा आणि अवघड होता असंही तो म्हणाला.
2016 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या ‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटाची घोषणा झाली होती. यामध्ये रणदीप मुख्य भूमिका साकारत होता. या चित्रपटासाठी तयारी सुरू असतानाच 2018 मध्ये अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाची घोषणा झाली. हे दोन्ही चित्रपट एकाच विषयावर आधारित होते. मात्र अक्षयच्या ‘केसरी’मुळे रणदीपने त्याचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केलाच नाही. तीन वर्षे ज्या भूमिकेसाठी आणि चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, अखेर तो चित्रपट हातातून निसटला होता. म्हणून त्यावेळी रणदीप नैराश्यात गेला.
याविषयी रणदीप म्हणाला, “चित्रपट बनवण्यासाठी मला तीन वर्षे लागली होती. त्या प्रोजेक्टमध्ये मी माझं सर्वस्व अर्पण केलं होतं. चित्रपटातील ईशर सिंहच्या भूमिकेसाठी मी तीन वर्षे माझे केस आणि दाढी वाढवली होती. त्यादरम्यान मला मिळालेले सर्व प्रोजेक्ट्स मी नाकारले होते. मात्र जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही असं समजलं, तेव्हा मी नैराश्यात गेलो. कोणीतरी माझी खूप मोठी फसवणूक केली असं मला वाटत होतं. माझी अवस्था पाहून माझे पालक मला एकटं कुठेच सोडत नव्हते. मी स्वत:ला एका रुममध्ये बंद करून घेतलं होतं.”
रणदीप सध्या आणखी एका ऐतिहासिक चित्रपटासाठी तयारी करत आहे. तो लवकरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आधी या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र रणदीपने त्यात बरीच ढवळाढवळ केल्याने मांजरेकर यांनी तो चित्रपट सोडला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदना निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे.