सरबजितच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; ‘कर्म’ म्हणत रणदीपने मानले आभार
भारतीय कैदी सरबजित सिंग यांच्या हत्येतील आरोपी आमिर तांबा याची रविवारी लाहौरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. तांबा हा 'लष्कर-ए-तैयबा'चा संस्थापक आणि दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहाय्यक होता.
पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग यांच्या हत्येतील आरोपी आमिर सरफराज तांबा याची रविवारी लाहौरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तांबा हा ‘लष्कर-ए-तैयबा’चा संस्थापक आणि दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहाय्यक होता. आमिरच्या हत्येनंतर अभिनेता रणदीप हुडाने मारेकऱ्यांचे आभार मानले आहेत. रणदीपने 2016 मध्ये ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजित’ या चित्रपटात सरबजित यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, रिचा चड्ढा आणि दर्शन कुमार हेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मारेकऱ्यांचे आभार मानले आहेत.
‘कर्म. त्या अनोळखी व्यक्तींचे मी आभार मानतो’, असं लिहित त्याने हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले. आमिर तांबाच्या हत्येची बातमी शेअर करत त्याने पुढे लिहिलं, ‘माझी बहीण दलबिर कौर यांची आठवण काढत स्वपनदीप पूनम यांना माझं प्रेम. आज शहीद सरबजित सिंग यांना थोडातरी न्याय मिळाला.’ पंजाबचे सरबजित सिंग ते त्यांच्या शेतात काम करत असताना अनवधानाने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरबजित सिंग लाहौरमधील कोट लखपत तुरुंगात होते. तिथे तांबासह काही कैद्यांनी सरबजित यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर आठवडाभरानंतर 2 मे 2013 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने 49 वर्षीय सरबजित यांचा मृत्या झाला होता.
View this post on Instagram
जुन्या लाहौरमधील सनतनगर या वर्दळीच्या भागात आमिर तांबा याचं घर आहे. तिथेच रविवारी दुपारी मोटरसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिथेच त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तांबाला चार गोळ्या लागल्या. त्यापैकी दोन छातीत तर दोन पायांमध्ये लागल्या. पोलिसांनी दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत रणदीप म्हणाला, “सरबजित हा बायोपिक करताना माझ्या मनात ही दु:खद भावना कायम होती की त्यांना भारतात परत आणण्यासाठीच्या प्रयत्नांना यश मिळत असताना तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली. आता त्यांच्या मारेकऱ्याच्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर सरबजित यांची बहीण दलबीरजी यांना कसं वाटलं असेल याचा विचार करतोय. सरबजित यांना भारतात परत आणण्यासाठी असंख्य प्रयत्न केल्यानंतर किमान आता त्यांना थोडा तरी न्याय मिळाल्याची भावना मनात असेल.” सरबजित यांची बहीण दलबीर कौर यांचं 2022 मध्ये निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीला रणदीप उपस्थित होता.