मुलीचा चेहरा माध्यमांपासून, फोटोग्राफर्सपासून लपवण्यामागचं खरं कारण काय? राणी मुखर्जीकडून खुलासा
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी जेव्हा चिमुकल्या पाहुणा किंवा पाहुणीचं आगमन होतं, तेव्हा त्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अद्याप त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवला नाही किंवा सोशल मीडियावर फोटो अपलोड केले नाहीत.
मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या जोडीने हजेरी लावली. राणीने चित्रपट निर्माता आणि यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्राशी लग्न केलं. या दोघांना अदिरा ही मुलगी आहे. मात्र जन्मापासूनच राणी आणि आदित्यने अदिराला माध्यमांपासून, फोटोग्राफर्सपासून दूर ठेवलं. आजवर अदिराचे फार क्वचित फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. आता कॉफी विथ करण या शोमध्ये राणीने मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्यामागचं कारण सांगितलं. त्याचसोबत पापाराझींना तिचे फोटो काढण्यापासून ती कसं थांबवते, याचाही खुलासा राणीने यावेळी केला.
फोटो क्लिक करू नये यासाठी काय करते राणी?
राणीने सांगितलं, “मी आधी पापाराझींना अदिराचे फोटो क्लिक न करण्याची विनंती करते. त्यानंतर ते माझे डोळे पाहूनच घाबरतात. मुलीचे फोटो काढू नका असं सांगितल्यानंतर ते माझ्या डोळ्यांकडे पाहतात आणि घाबरून फोटो क्लिक करत नाहीत.” हे ऐकताच सूत्रसंचालक करण जोहर आणि काजोल हसू लागतात.
अदिराला पापाराझींपासून दूर का ठेवते?
अदिराला फोटोग्राफर्स आणि माध्यमांपासून लांब ठेवण्यामागचं कारण सांगताना ती पुढे म्हणाली, “अदिराला या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवण्याचा आम्हा दोघांचा निर्णय होता. अदिराच्या जन्मापासून मी सर्व पापाराझींचे आणि माध्यमांचे आभार मानते की त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर केला. आदित्य चोप्रा कसा आहे हे त्यांना माहीत आहे. अदिराचं संगोपन कसं करायचं याची आमची वेगळी कल्पना आहे. अदिराला खास असल्याचं वाटू नये किंवा शाळेत तिला तशी वागणूक मिळू नये, इतरांसोबत तिला सहज वावरता यावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. गरजेपेक्षा जास्त लक्ष तिच्याकडे दिलं जाऊ नये म्हणून हे सर्व करणं गरजेचं होतं आणि हे सर्व तिचे फोटोस न क्लिक केल्याने सहज शक्य झालं.”
यावेळी राणीने अदिरासोबतचा एक किस्सासुद्धा सांगितला. मुलीला घेऊन ती पहिल्यांदाच देशाबाहेर फिरायला जात होती. “कृपया बाळाचे फोटो क्लिक करू नका, अशी विनंती मी त्यांना केली. तेव्हापासून ते माझ्या निर्णयाचा आदर करतात. इतकंच नव्हे तर दरवेळी अदिरा तिच्या कारमध्ये जाईपर्यंत ते संयमाने प्रतीक्षा करतात आणि मग माझे फोटो क्लिक करतात. त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार मानते”, असं राणीने सांगितलं.