मुंबई : सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यानंतर त्या व्हिडीओतील व्यक्तीचं नशीबच पालटतं. असंच काहीसं रानू मंडलसोबत घडलं होतं. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन रानू मंडल प्रकाशझोतात आली होती. आता पुन्हा एकदा ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी रानू मंडलची प्रशंसा होत नाहीये तर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. रानू मंडलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती गानकोकिळा लता मंगेशकर यांची खिल्ली उडवताना दिसतेय.
लतादीदीच्या चाहत्यांना रानू मंडलने केलेला हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सोशल मीडियावर रानू मंडलची चांगलीच शाळा घेतली. या व्हिडीओमध्ये रानू मंडल गाणं गाण्याआधी म्हणते, “हे गाणं लता फताचं नाही. हे गाणं लताजींचं नाही. जे मी गायलं आहे, त्याचाही आवाज चांगला आहे, चांगला होता आणि चांगला राहील.” यानंतर ती 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातील ‘है अगर दुश्मन जमाना..’ हे गाणं गाऊ लागते.
रानू मंडलने गायलेलं हे सुपरहिट गाणं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आहे. आजसुद्धा चाहत्यांमध्ये हे कव्वाली गाणं हिट आहे. रानू मंडलने गायलेलं गाणं लताजींचं नसलं तरी ज्या पद्धतीने तिने गानसम्राज्ञीचं नाव घेतलं, ते नेटकऱ्यांना आवडलं नाही. ‘लता-फता’ असा उल्लेख केल्याने चाहते रानू मंडलवर चांगलेच भडकले. ‘लतादीदींचा आदर करायला शिक’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘लता फता असं नाही बोलायला पाहिजे. त्या संपूर्ण भारतासाठी प्रेरणा आहेत’, अशी कमेंट दुसऱ्याने केली.
रानू मंडल ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आपल्या वक्तव्यांमुळे आणि रिल व्हिडीओमुळे रानू मंडल सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
रानू मंडल या महिलेला सोशल मीडियाने ओळख दिली. रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा तिचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. लोकांना रानूचा आवाज खूप आवडला. या व्हिडीओमुळे ती रातोरात स्टार झाली. यानंतर तिला एका गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. जिथे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली होती. यानंतर हिमेशसोबत रानूने ‘तेरी मेरी कहानी’ गाणं गायलं. त्यावेळी ती तिच्या मेकअपमुळेही ट्रोल झाली होती. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर रानू बदलली, असं अनेकांचं म्हणणं होतं.