रणवीरच वेषांतर करून पोहोचला की काय? 93 वर्षीय आजोबांना पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजोबांचा फोटो पोस्ट केला आहे. वयाच्या 93 वर्षी त्यांनी मतदान केलं. रॉकस्टार आजोबा असं म्हणत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडलं. यावेळी सर्वसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कलाकारांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. अभिनेता रणवीर सिंहनेही पत्नी दीपिका पादुकोणसोबत मतदान केलं. यानंतर रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजोबांचा फोटो पोस्ट केला. वयाच्या 93 व्या वर्षीही रणवीरच्या आजोबांनी धगधगत्या उन्हातून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. त्यांची हीच गोष्ट अभिमानाने सांगत रणवीरने हा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
‘माझे रॉकस्टार आजोबा’ म्हणत रणवीरने हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यावर एकाने लिहिलं, ‘मला वाटलं की रणवीरच वेषांतर करून मतदान करायला पोहोचला आहे.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘हे तर 93 वर्षीय रॉकी रंधावा आहेत.’ आजोबांचं वेषांतर करून रणवीरच मतदान करायला गेला, असे कमेंट्स अनेकांनी केले आहेत. रणवीरचे आजोबा वयाच्या 93 व्या वर्षीही खूप हँडसम असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
रणवीरचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला असून त्याच्या आईचं नाव अंजू आणि वडिलांचं नाव जगजीत सिंह भवनानी आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी त्याचे आजी-आजोबा हे कराची, सिंध इथून मुंबईत आले. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण गरोदर असून तिच्यासोबत तो मतदान केंद्रावर पोहोचला होता. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाल्याने नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित गरोदर असल्याची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्नगाठ बांधली. मात्र त्यापूर्वी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण 8’मध्ये केला होता. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दीपिकाने सर्वसामान्य विवाहित जोडप्यांप्रमाणेच आमच्याही संसारात कठीण काळ आल्याची कबुली दिली होती. “जर एखाद्याला असं वाटत असेल की लग्न म्हणजे रोज सकाळी उठून कोणीतरी तुम्हाला तुमचा कॉफी बनवून देतोय किंवा दररोजची पहाट सुंदर होतेय, तर हे साफ खोटं आहे. अर्थात काही दिवस असेही असतात. पण लग्न म्हणजे काम आहे आणि कामच लग्नाला सुंदर बनवतं”, असं मत तिने मांडलं होतं.