तो काही माइंड ब्लोइंग अभिनेता नाही, फक्त..; ‘मर्डर 2’ फेम अभिनेत्याने रणवीर सिंहला म्हटलं ‘खोटं’
पडद्यावर अनेक नकारात्मक भूमिका साकारलेला अभिनेता प्रशांत नारायणन याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणवीर सिंहवर टीका केली आहे. कोट्यवधींचं मानधन घेऊन खोटं बोलतात, असं त्याने थेट म्हटलंय.
अभिनेता रणवीर सिंहने ‘पद्मावत’ या चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारून प्रेक्षक-समीक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत होता, तरीही दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्या तुलनेत त्याचीच अधिक चर्चा झाली. खिल्जीच्या भूमिकेची तयारी करताना आणि अभिनय करताना त्याचा मानसिकदृष्ट्याही परिणाम झाल्याचं रणवीरने त्यावेळी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. त्याच्या या वक्तव्याला आता एका अभिनेत्याने खोटं ठरवलं आहे. ‘मर्डर 2’मध्ये भूमिका साकारलेला अभिनेता प्रशांत नारायणन याने रणवीरच्या अभिनयाला ‘खोटं’ असं म्हटलंय. त्याच्याप्रमाणे त्याच्या ‘डार्क परफॉर्मन्स’च्या दाव्याचीही खिल्ली उडवली आहे.
प्रशांतने ‘मर्डर 2’मध्ये अशाच पद्धतीची नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने ‘रंगबाज’, ‘अभय’, ‘माई’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही काम केलंय. प्रशांतला पडद्यावर अनेकदा नकारात्मक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणाऱ्या ‘डार्क’ भूमिका साकारताना पाहिलं गेलंय. अशा भूमिकांचा अनुभव असल्याने त्याने खलनायकी भूमिका साकारताना ‘डार्क झोन’मध्ये जाण्याच्या वक्तव्याला साफ खोटं म्हटलंय.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत प्रशांतच्या रणवीरच्या जुन्या मुलाखतीतील वक्तव्याविषयी प्रश्न विचारला गेला होता. रणवीरने त्यावेळी असं म्हटलं होतं की खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी त्याने 21 दिवस स्वत:ला सर्व गोष्टींपासून लांब केलं होतं. या भूमिकेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की नंतर त्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रशांत म्हणाला, “तो खोटं बोलतोय. तो असा काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही. त्याने अशी कोणती माइंड-ब्लोइंग भूमिका साकारली नव्हती जिथे त्याला हे सर्व करावं लागलं असेल. नाही भावा, तू तुझ्या सेटवर जा, तुझा चांगला मेकअप केला जाई आणि तू फक्त मनापासून काम कर.”
प्रशांतनेही असंही म्हटलंय की अभिनेते या सर्व गोष्टी अशा कारणासाठी सांगतात, कारण त्यांना मिळालेल्या कोट्यवधी मानधनाच्या मूल्याशी समाधान व्यक्त करायचं असतं. “हे डार्क फेजमध्ये जाणं किंवा नकारात्मक होणं.. सगळं बकवास आहे. कुठे ना कुठे तुम्हाला स्वत:च्या मानधनाला न्याय द्यावा लागेलच ना. म्हणून ते असं वक्तव्य करतात”, असं तो थेट म्हणाला.
“मला तर अशा अभिनेत्यांवरही हसायला येतं जे स्वत:ला अत्यंत गंभीर असल्याचं दाखवतात. अरे का सीरिअस होता? रुग्णालयात होता का? मी माझ्या कोणत्याच भूमिकेविषयी असं कधी बोललो नाही. हे कलाकार चेहऱ्यावर खूप गंभीर दिसतात आणि त्यांना विचारलं की म्हणतात, अरे मी ते डायलॉग्स म्हणत होतो. फक्त डायलॉग्सचा विषय असेल तर ते तरी नीट करा ना. चांगला दीर्घ श्वास घ्या”, असं म्हणत तो जोरजोरात हसला.