मेले असते तर बरं झालं असतं..; असं का म्हणाली ‘उतरन’मधील ‘तपस्या’?
अभिनेत्री रश्मी देसाईला 'उतरन' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. याच मालिकेतून तिच्या आयुष्यात प्रेमाची एण्ट्री झाली होती. अभिनेत नंदीश संधू आणि रश्मी हे एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र लग्नानंतर या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
अभिनेत्री रश्मी देसाई ही ‘उतरन’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तिचं खरं नाव शिवानी देसाई असं असून अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने तिचं नाव बदललं. रश्मी ही मूळची आसामची असल्याने करिअरची सुरुवात तिने आसामी चित्रपटांमधूनच केली होती. नंतर तिने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिथे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. चित्रपटांनंतर रश्मीने टीव्ही क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला आणि तिथंही खूप नाव कमावलं. करिअरमध्ये जरी रश्मीला सुरुवातीला खूप यश मिळालं तरी तिच्या खासगी आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. 38 वर्षीय रश्मीच्या आयुष्यात दोनदा प्रेम आलं, पण तिची प्रेमकहाणी कधीच पूर्ण होऊ शकली नाही. यामुळेच तिला तिच्या आयुष्यात बरेच चढउतार सहन करावे लागले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पारस छाबडाच्या पॉडकास्ट मुलाखतीत रश्मी तिच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘उतरन’ या मालिकेमुळे रश्मीला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. तर याच मालिकेतून तिच्या आयुष्याच प्रेमाची एण्ट्री झाली. इथे तिची भेट अभिनेता नंदीश संधूशी झाली होती. सेटवर एकत्र काम करता करता हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी 2011 मध्ये लग्न केलं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या पाच वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
डोक्यावर 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज
रश्मीने या मुलाखतीत सांगितलं की नंदीश संधूशी लग्न आणि घटस्फोटानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. लग्नाच्या काही काळानंतर दोघांच्या नात्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. एकीकडे वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या, तर दुसरीकडे तिच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं. जवळपास तीन कोटी रुपयांचं कर्ज रश्मीवर होतं. तिने घर खरेदी केलं होतं आणि त्या घराचं अडीच कोटी रुपये कर्ज तिच्या डोक्यावर होतं.
View this post on Instagram
20 रुपयांचं जेवण खाऊन काढले दिवस
रश्मीने पुढे सांगितलं की ती ज्या मालिकेत काम करत होती, ती मालिका अचानक बंद झाली होती. यामुळे हाती पैसाही शिल्लक राहिला नव्हता. अखेर तिला वीस रुपयांत जेवण करावं लागलं होतं. नंदीशला घटस्फोट दिल्यानंतर कुटुंबीयही तिच्यावर नाराज झाले होते. घरातूनही साथ न मिळाल्याने रस्त्यावर गाडीत झोपावं लागलं होतं, असाही खुलासा तिने केला. या सर्व परिस्थितीमुळे रश्मी नैराश्यात गेली होती. त्यातच तिला Psoriasis नावाचा आजार झाला होता.
आजारपणामुळे रश्मीचं वजन वाढत होतं आणि केस गळत होते. ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी सुंदर दिसणं खूप महत्त्वाचं होतं, तिथे रश्मीला सौंदर्य गमावल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. “असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं”, असे उलटसुलट विचार तिच्या मनात येऊ लागले होते. या सर्व आव्हानांचा सामना केल्यानंतर रश्मीने पुन्हा नव्याने सुरुवात केली.
या मुलाखतीत रश्मीने सांगितलं की तिला चांगल्या पार्टनरची प्रतीक्षा आहे. “मला लग्न करण्याची काहीच घाई नाही. पण मला इंडस्ट्रीमधील पार्टनर नकोय. माझ्या कामाला समजू शकेल, असा पार्टनर मला हवा आहे. माझ्यावर दबाव आणण्यापेक्षा तो मला पाठिंबा देईल, अशी व्यक्त हवी आहे”, असं ती म्हणाली.