आखिर कहना क्या चाहते हो? ‘ॲनिमल’मधील डायलॉगवरून रश्मिका ट्रोल, दिग्दर्शकाने सोडलं मौन
'ॲनिमल' या चित्रपटातील एक सीन सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. हा सीन अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आहे. या सीनमध्ये रश्मिका नेमकं काय म्हणतेय, तेच समजत नाही. म्हणूनच तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं. या ट्रोलिंगवर आता दिग्दर्शकाने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करतेय. ‘ॲनिमल’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार सुरू आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील रणबीर कपूरचा अभिनय आणि बॉबी देओलच्या ॲक्शन सीन्सने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. त्याचसोबत रश्मिकाच्या एका डायलॉगची जोरदार चर्चा होतेय. तिने ज्या पद्धतीने तो डायलॉग म्हटला आहे, त्यावरून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. आता चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ॲनिमल या चित्रपटात रश्मिका रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारतेय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिला फक्त पाच ते सहा सेकंदांसाठी दाखवण्यात आलं आहे. या पाच ते सहा सेकंदातही ती काय डायलॉग म्हणतेय, तेच नीट ऐकू येत नाही. तिचा डायलॉग आणि अभिनय ऐकून प्रेक्षकांनी डोक्यालाच हात मारला आहे. नेटकऱ्यांनी यावरून रश्मिकाला खूप ट्रोल केलंय. ‘मला अजूनही कळत नाही की दिग्दर्शकाने या डायलॉगला मंजुरी कशी दिली’, असं एकाने विचारलंय. तर ‘रश्मिकाने 5 सेकंदांमध्ये हिंदी आणि इंग्रजीची बँड वाजवली’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
रश्मिकाच्या या सीनविषयी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाले, “त्या सीनवरून अशा प्रतिक्रिया येतील, याची मला आधीच कल्पना होती. रश्मिकाला त्या सीनमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने बोलायचं होतं, कारण तो अत्यंत भावनिक सीन होता. जेव्हा एखादी व्यक्ती त्या परिस्थितीचा सामना करते, तेव्हा ती दात-ओठ खाऊनच बोलते. हा फक्त ट्रेलर असल्याने तुम्हाला त्याचा संदर्भ लक्षात येत नाही. पण संपूर्ण चित्रपट पाहाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्यामागचा अर्थ समजेल.” ॲनिमल हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रश्मिका आणि रणबीरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. कमी वयात तिने प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले. चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिचं नाव जोडलं जातं. असं असलं तरी तिचा आधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. रश्मिकाने दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोडला होता.