रवीना टंडनच्या लेकीची सर्व स्टारकिड्सना तगडी टक्कर; आईसारखाच जबरदस्त डान्स अन् हावभाव
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. 'आझाद' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून त्यातील तिचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील राशाच्या डान्स आणि हावभावांवर नेटकरी फिदा झाले आहेत.
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. इतकंच नव्हे तर पदार्पणातच ती भल्याभल्या स्टारकिड्सना तगडी टक्कर देतेय. ‘आझाद’ या चित्रपटातून राशाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकलंय. या चित्रपटातील राशाचं पहिलं गाणं (आयटम साँग) नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित जालं आहे. ‘ऊई अम्मा’ असं या गाण्याचं नाव असून प्रदर्शित झाल्या झाल्या ते सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होऊ लागलंय. इन्स्टाग्रामवर राशाच्या डान्सचे रील्स व्हायरल होऊ लागले आहेत. या गाण्यातील तिचा अप्रतिम डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी तिचं भरभरून कौतुक करत आहेत. या एका गाण्याने राशाने सर्व स्टारकिड्सना मागे टाकलंय, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
राशाच्या या पहिल्यावहिल्या गाण्याला युट्यूबवर अवघ्या 48 तासांत दीड कोटींपेक्षा अधिक व्हूज आणि 88 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘राशाचा हा पहिलाच चित्रपट आहे असं वाटतंच नाही, तिने जबरदस्त डान्स आणि हावभाव दिले आहेत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ओह माय गॉड, स्टारकिड्सकडून आम्हाला अशाच परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. स्क्रीनवर जणू आम्ही रवीनालाच पाहतोय असं वाटतंय. राशाला 10 पैकी 10 गुण’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘अखेर बऱ्याच वर्षांनंतर एका हिरोईनचा जन्म झालाय. बॉलिवूडमध्ये स्वागत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.
View this post on Instagram
केवळ डान्स आणि हावभावमुळेच नाही तर राशा तिच्या हजरजबाबीपणामुळेही चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान तिने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत विचारपूर्वक दिली. “माझ्या आईने मला सांगितलंय की भगवद् गीतामध्ये लिहिलंय, कृष्ण यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त कठोर मेहनत करा. त्यानंतर जे होईल ते सर्व देवावर सोडून द्या. या इंडस्ट्रीत खूप अटॅचमेंट, ओव्हरथिंकिंग आणि चढउतार आहेत. पण तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसलात तर तुम्ही त्यातच वाहून जाल. तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि आपलं बेस्ट काम करा. बाकी सगळं शिवजी जे काही करतील ते तुमच्या यशासाठीच करतील”, असं उत्तर राशाने दिलं.
राशाचा ‘आझाद’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून राशासोबतच अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. यामध्ये अजय देवगणची मुख्य भूमिका आहे.