मुंबई : अभिनेत्री रवीना टंडनने बुधवारी दिल्लीत पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. यावेळी तिच्यासोबत मुलगी राशा थडानीसुद्धा होती. दिल्लीहून परतताना या दोघींना मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. पापाराझींनी रवीनाचे तिच्या मुलीसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एअरपोर्टवर फोटो क्लिक करण्याच्या नादात राशाला एका व्यक्तीकडून धक्का लागला. त्यानंतर संतापलेल्या रवीनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एअरपोर्टवर आल्यानंतर गाडीच्या दिशेने जाताना रवीना पापाराझींशी गप्पा मारत असते. त्यांना लवकरच पार्टी देण्याचंही ती आश्वासन देते. यावेळी रवीनासोबत सेल्फी क्लिक करण्याच्या नादात एका व्यक्तीचा धक्का राशाला लागतो. त्यानंतर राशा पुढे गाडीच्या दिशेने जाते. गाडीजवळ पोहोचल्यानंतर रवीना त्यांना म्हणते, “काळजीपूर्वक वागा. तुम्ही धक्का देऊ नका. मुलांना धक्का देऊ नका.”
बुधवारी राष्ट्रपती भवनमध्ये पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रवीनाला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.
पुरस्काराबद्दल बोलताना रवीना म्हणाली, “या पुरस्कारासाठी मी कृतज्ञ आहे. माझं योगदान, माझं आयुष्य, माझी आवड- सिनेमा आणि कला यांची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारची मी आभारी आहे. या प्रवासात ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचे मी आभार मानते. जे माझा हात धरून माझ्यासोबत होते आणि ज्यांनी माझा हा प्रवास वरून पाहिला, त्यांच्यासाठीही मी कृतज्ञ आहे. हा पुरस्कार मी माझ्या वडिलांना समर्पित करते. मी त्यांची ऋणी आहे.”
रवीना गेल्या वर्षी ‘केजीएफ 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आगामी ‘घुडचडी’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.