माझं रक्त खवळतंय..; वसईत प्रेयसीची दिवसाढवळ्या हत्येप्रकरणी रवीना टंडनकडून संताप व्यक्त
घटनास्थळी लोकांची बरीच गर्दी होती. मात्र रोहित आरतीवर वार करत असताना एकही जण तिला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. अनेकजण या घटनेची आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करत होते. केवळ एका तरुणाने मध्ये पडून आरतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला इतरांनी साथ दिली असती, तर कदाचित आरतीचे प्राण वाचले असते.
एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची वार करून हत्या केल्याची घटना वसई पूर्वेकडील गावराई पाडा इथं घडली. मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भररस्त्यात हा प्रकार सुरू असताना उपस्थित जमाव तरुणीला वाचविण्याऐवजी व्हिडीओ शूट करण्यातच दंग असल्याचं विदारक चित्र यावेळी दिसलं. या घटनेबाबत विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री रवीना टंडननेही यावर राग व्यक्त केला. एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित ती वसईतील या धक्कादायक घटनेविषयी चीड व्यक्त केली. जे लोक बघ्याची भूमिका घेत होते, ते अत्यंत सहजपणे त्या तरुणीला वाचवू शकले असते, असं तिने त्यात म्हटलंय. अशा घटना पाहून माझं रक्त खवळतं, असंही तिने लिहिलं आहे.
रवीना टंडनची पोस्ट-
‘जे लोक तिथे बघत उभे होते, ते तिला सहज वाचवू शकले असते. खरंच लाजिरवाणं आहे हे. कोणीही मदतीला पुढे आलं नाही हे पाहून माझं रक्त खवळतंय. कधीकधी एखाद्या व्यक्तीकडे त्या वेळी हुशारी दाखवण्याचं गुण असावं लागतं. त्या परिस्थितीत तुम्ही स्वत:ला ठेवून पहा. त्या तरुणाकडे कोणतीही धारदार वस्तू नव्हती. या संपूर्ण घटनेत फक्त दोन मुलांनी हिंमत दाखवण्याची गरज होती. अशा प्रकारचे गुंड खरंतर भित्रे असतात. ज्या क्षणी त्यांना प्रतिकार केला जाईल, त्याक्षणी ते पळून जातील. खोट्या गोष्टींमागे ते लपतात,’ अशी पोस्ट रवीनाने लिहिली आहे.
All bystanders could’ve easily saved her … Shame . My blood boils to see that no one came forward . . Sometimes one just has to have that presence of mind . Even if it means putting yourself on the line . He did not have any sharp object. All it needed was two guys to muster… https://t.co/KQ3spqHRPo
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 19, 2024
नेमकं काय घडलं?
नालासोपारा इथं राहणाऱ्या आरती यादव (22) आणि रोहित यादव (29) यांचं गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होतं. बारावी पास असलेली आरती गावराई इथल्या एका खासगी कंपनीत कामाला होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं. आरती रोहितला टाळू लागली होती. याचा राग मनात ठेवून मंगळवारी सकाळी आरती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली असताना रोहितने तिला अडविलं. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि रोहितने त्याच्या बॅगेतून लोखंडी पाना काढून आरतीवर 16 वार केले. या हल्ल्यात तिने जागीच प्राण गमावले. आरतीची हत्या केल्यानंतर रोहित तिथेच बसून राहिला. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नंतर अटक केली. आरोपी मूळचा हरियाणाचा असून तो नालासोपाराच्या संतोष भवनमध्ये एकटाच राहत होता.