मुंबई : आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाझुद्दीनवर त्याची पत्नी आलिया सिद्दीकी आणि भाऊ शमस सिद्दीकीने बरेच आरोप केले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमसने नवाझुद्दीन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्यातील वादाबाबत खुलासा केला. चौकटीबाहेरील भूमिका सहज साकारण्यासाठी ओळखले जाणारे हे दोन्ही कलाकार एकेकाळी एकमेकांशी बोलत नव्हते. इतकंच नव्हे तर या दोघांमधील वादामुळे ‘ द लंचबॉक्स’ या चित्रपटाची शूटिंग रखडली होती, असं शमसने सांगितलं.
इरफान खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकीने पान सिंह तोमर, द लंचबॉक्स, न्यूयॉर्क आणि आजा नचले यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. मात्र एकेकाळी या दोघांमध्ये वाद सुरु होता आणि त्यामुळे दोघं एकमेकांशी बोलणं टाळायचे, अशी चर्चा होती. या वादामागचं नेमकं कारण कधीच समजू शकलं नव्हतं. मात्र आता नवाझुद्दीनच्या भावाने त्याविषयी सविस्तर सांगितलं.
या दोघांमध्ये खरंच काही वाद होता का, असा प्रश्न शमसला विचारलं असता त्याने होकारार्थी उत्तर दिलं. याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, ” इरफान भाईला मी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ओळखायचो. इरफान आणि नवाझुद्दीन यांच्यामध्ये आधी सगळं काही ठीक सुरू होतं. मात्र इरफान खानची अमेरिकेत एक गर्लफ्रेंड होती. तीच अफेअर नंतर नवाझुद्दीनसोबत झालं. याच कारणामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली.” 2009 मध्ये जेव्हा न्यूयॉर्क हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा वाद झाल्याचं शमसने स्पष्ट केलं.
इरफान आणि नवाझुद्दीन यांच्या ‘ द लंचबॉक्स’ या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये काहीच आलबेल नव्हतं, असंही शमसने सांगितलं. या दोघांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. या वादामुळे चित्रपटाची शूटिंग एके दिवशी रखडली होती. अखेर दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुढाकार घेत दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
इरफान खानचं 29 एप्रिल 2020 रोजी कॅन्सरने निधन झालं. त्यानंतर 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनने इरफानसोबत कोणताच वाद नसल्याचं स्पष्ट केलं. “इरफान भाई माझ्यासाठी एका मोठ्या भावाप्रमाणे होता आणि त्याच्यासोबत काम करतानाच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्यासोबत आहेत. द लंचबॉक्स चित्रपटाच्या आधीही आमच्यात चांगली मैत्री होती”, असं नवाजुद्दीन म्हणाला होता.